13474
इचलकरंजी : सध्या उत्तम प्रकाश चित्रमंदिर परिसरातील रस्त्यावरच वैरण बाजार भरत आहे.
वैरण बाजाराला हक्काच्या जागेची प्रतीक्षा
रस्ताच ठरतोय आधार; पाच दशकांपासून वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर
ऋषिकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १४ : नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन शहरात आठवडी भाजीपाला बाजारासाठी निश्चित जागा, सुविधा आणि शिस्तबद्ध व्यवस्था उभारली जात असताना जनावरांच्या पोटाची भूक भागविणारा वैरण बाजार मात्र आजही हक्काच्या जागेसाठी झगडत आहे. पाच दशकांपासून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या या बाजाराच्या वाट्याला मात्र अद्यापही कायमस्वरूपी जागा आलेली नाही.
इचलकरंजीसह शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील अनेक गावांमधील पशुपालकांसाठी वैरण बाजार हा आजही महत्त्वाचा आधार आहे. शहराच्या आसपासच्या गावांमधून शेतकरी शाळू, मका, हिरवे गवत यांसह विविध प्रकारचा चारा घेऊन बाजारात येतात. अनेक ठिकाणी वैरण बाजारांचे अस्तित्व संपत असताना इचलकरंजीतील बाजाराने मात्र आपली गरज आणि उपयुक्तता टिकवून ठेवली आहे.
प्रत्येक वेळी तात्पुरती व्यवस्था करून बाजार हलविण्यात आला. सध्या रस्त्यावर बाजार भरत असल्याने चारा विक्रेते, शेतकरी आणि ग्राहकांना वाहनांच्या गर्दीतच व्यवहार करावा लागतो. चारा घेण्यासाठी ग्राहक रस्त्यावर वाहने थांबवित असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यातून वाहतूक कोंडी, किरकोळ अपघात तसेच मोठ्या अपघातांचा धोका कायम आहे.
--------------
चौकट
बाजाराला स्थलांतराचे चटके
पाच दशकांपासून स्थलांतराचे चटके वैरण बाजाराला सोसावे लागत आहेत. सुरुवातीला मलाबादे चौक, सुंदर बाग परिसरात हा बाजार भरत होता. त्यानंतर शंकरराव पुजारी जलतरण तलाव परिसरात बाजार हलविण्यात आला. तेथील अडचणींनंतर श्रीमंत घोरपडे नाट्यगृहाच्या पाठीमागे त्याची व्यवस्था केली. मात्र, तेथेही कायमस्वरूपी सोय होऊ शकली नाही. अखेर सध्या उत्तम प्रकाश चित्रमंदिर परिसरातील रस्त्यावरच वैरण बाजार भरत आहे.
----------------
दृष्टिक्षेपात
* रोजची आवक : ८० हून अधिक बैलगाड्या
* विक्रेते : सुमारे १५
* दैनंदिन उलाढाल : सुमारे दोन लाख रुपये
* मुख्य अडचणी : वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका, पावसाळ्यात गैरसोय, चारा साठवणुकीची समस्या
-----------------
कोट
शेतकरी आणि वैरण विक्रेत्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे सुसज्ज जागेची मागणी केली आहे. बाजारासाठी बंदिस्त जागा, चारा साठवणुकीची सुविधा, वाहनतळ, पाणी, स्वच्छतागृह आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली तर गैरसोय दूर होऊ शकते.
- मनोज केसरकर, वैरण विक्रेते
------------------
रस्त्यावरील वैरण बाजार सुसज्ज जागेत स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच बंदिस्त जागेत सर्व सोयींनीयुक्त वैरण बाजार भरविण्यात येईल. त्यामुळे चारा विक्रेते, ग्राहक आणि शेतकऱ्यांची चांगली सोय होईल.
- सुशांत कलागते, सभापती, महापालिका प्रभाग समिती
JMH26B13474
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.