शिरोळ
-गणेश शिंदे
यड्रावकरांकडेच पुन्हा आमदारपदाची ‘पाटीलकी’
जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुद्ध साखर कारखानदार अशा चुरशीच्या लढतीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली. स्वाभिमानीचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
दोन हजार कोटींची विकासकामे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबरोबरच नियोजनबद्ध प्रचार, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची बांधणी, कोणतीही टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर मतदारसंघात मत देण्याचे आवाहन आमदार यड्रावर यांनी केले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रचाराच्या काळात यड्रावकरांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. जयसिंगपूर नगरपालिकेतील कारभाराचा पाढा त्यांनी वाचला होता. स्मार्ट सिटी अंतर्गत एलईडी पोल, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत याबरोबरच वैयक्तिक पातळीवर टीकेची झोड उठवली.
स्वाभिमानीचे खंदे समर्थक सावकर मादनाईक यांनी सहकाऱ्यांसह ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत प्रवेश केला. त्यामुळे सावकार मादनाईक यांच्यासह सहकाऱ्यांनी महायुतीचा पर्यायाने यड्रावकर यांचा प्रचार केला. मदनाईक यांनी स्वाभिमानीतील अनेक कार्यकर्त्यांना संपर्क साधून मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराचा मुद्दा प्रचारात ठळकपणे मांडला. तालुक्यात शेतकरी चळवळ टिकली पाहिजे. कारखानदार निवडून आला किंवा पडला तरी याचा शेतकऱ्यांना काही फरक पडणार नाही. मात्र, चळवळ संपली तर ऊसदराच्या आंदोलनाला मर्यादा येणार आहेत. विधानसभेत शेतकऱ्यांचा आवाज उठवणाऱ्या उल्हास पाटील यांना विजयी करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी तालुक्यातील गावे आणि गल्लीबोळ पिंजून काढले.
दत्त साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक गणपतराव पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. तालुक्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न त्यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी होता.
माजी आमदार स्व. सा. रे. पाटील यांचे चिरंजीव असल्याने त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. एकूणच प्रचाराच्या काळात प्रमुख तीनही उमेदवारांनी आपली भूमिका ठासून सांगताना आपला विजय कशासाठी गरजेचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदारांनी यड्रावकर यांना विजयी करत दुसऱ्यांदा संधी दिली आहे.
घडले काय?
१) यड्रावकरांकडून विकासकामांचा जोरदार प्रचार
२) ‘लाडकी बहीण’सह नियोजनबद्ध प्रचाराचा फायदा
३) सावकार मादनाईक सोडून जाण्याचा स्वाभिमानीला फटका
४) ऊसदर, चळवळी टिकविण्याचा मुद्द्याचा प्रभाव नाही
५) गणपतराव पाटील यांची प्रचारात आघाडी; मात्र विजयापासून दूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.