रस्त्यासाठी अर्जुनवाडमध्ये
आंदोलनाचा इशारा
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातून जाणारा सलगरे ते पाचवा मैल राज्यमार्ग १५३ रस्त्यातील अपूर्ण कामामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. १५ दिवसांत त्रुटी दूर करून रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा अर्जुनवाड येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा, ‘आंदोलन अंकुश’चे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज यांना निवेदन देऊन संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरजचे उपकार्यकारी अभियंता श्री. गुळवे तसेच राजपथ कन्ट्रक्शनकडून बाहुबली गाढवे यांनी रस्त्याच्या अपूर्ण कामाची पाहणी करून चर्चा केली. अर्जुनवाडपासून हेरवाडपर्यंत रस्त्याची पाहणी केली. अपूर्ण कामाबाबत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व अर्जुनवाडमधील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत अपूर्ण कामाबाबत जाब विचारला. अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत ज्या त्रुटी असतील, त्या दूर करून कामास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे राकेश जगदाळे, राहुल गायकवाड उद्वव मगदूम, अनिल सुतार उपस्थित होते.