उघड्यावर कचरा टाकल्यास घरफाळ्यात दंड
कागल नगरपरिषदेचा बडगा; दोन सत्रांत होणार पाहणी
सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. २८ : कागल नगरपरिषदेकडून शहर स्वच्छतेसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली असून, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिक आणि संस्थांवर आता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे हा दंड संबंधितांच्या घरफाळा करामध्ये समाविष्ट करून वसूल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कागल नगरपरिषद शहर स्वच्छ आणि हागणदारीमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन, ओला व सुका कचरा विलगीकरण, तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती यांसारखे उपक्रम सुरू आहेत. नागरिकांना सुलभतेने कचरा वर्गीकरण करता यावे यासाठी घरोघरी कंटेनरचेही वितरण करण्यात आले आहे.
मात्र, पालिकेच्या वारंवार सूचना व जनजागृतीनंतरही काही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेने केलेल्या पाहणीत शहरातील तब्बल २५ ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे आढळून आले.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ४५० ‘अ’ तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०११ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रांमध्ये स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार असून, कचरा उघड्यावर टाकताना आढळणाऱ्या नागरिक व संस्थांवर तत्काळ दंड आकारला जाणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे शहरात स्वच्छतेबाबत शिस्त निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, उघड्यावर कचरा टाकणे नागरिकांना आता चांगलेच महागात पडणार आहे.
चौकट
कचरा टाकली जाणारी ठिकाणे
वड्डवाडी, गोसावी वसाहत, अनंत रोटो परिसर, यशिला पार्क, जयसिंगराव पार्क, श्रमिक वसाहत, ठाकरे चौक, गणेश नगर, माळी गल्ली, रोटे गल्ली, करंजे पाणंद, सोमवार पेठ, पशुवैद्यकीय दवाखाना परिसर, आंबील कट्टी, जॅकवेल रोड.
कोट
पालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. दंड थेट घरफाळ्यात समाविष्ट करून वसूल केला जाणार असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
नितीन कांबळे, आरोग्य निरीक्षक, कागल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.