10281
कागल : कागल पंचायत समिती सभेत सूचना करताना सभापती सुवर्णा पाटील, उपसभापती डॉ. इंद्रजित पाटील.
गर्भलिंग निदान कारवाई, शैक्षणिक गुणवत्तेवर भर
कागल पंचायत समिती सभेत निर्णय; ‘नो टीव्ही, नो मोबाईल’ संकल्पना राबविणार
सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. २७ : तालुक्यातील स्रीभ्रूण हत्या व गर्भलिंग निदानाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, सायंकाळी सात ते नऊ ‘नो टीव्ही, नो मोबाईल’ ही अभिनव संकल्पना राबवावी, पावसाळ्यानंतर रस्त्यांची डागडुजी करावी, अशा सूचना कागल पंचायत समितीच्या मासिक सभेत केल्या. सभापती सुवर्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.
सभेत स्रीभ्रूण हत्या रोखणे, शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा, महामार्गांवरील खड्डे बुजविणे, सौरऊर्जा योजनेचा लाभ तसेच विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत विविध विषयांवर चर्चा झाली. सदस्य बालाजी फराकटे यांनी बिद्री परिसरातील गर्भलिंग निदानाच्या प्रकारांवरही तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार आरोग्य विभागाला कायद्यानुसार कारवाईच्या सूचना दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत काही त्रुटी आढळल्याने शिक्षण विभागाने सुधारणा करावी, असे निर्देश दिले.
पावसाळ्यानंतर ग्रामीण तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील खड्डे बुजवून डागडुजीची मागणी उपसभापती इंद्रजित पाटील यांनी केली. घरकुल लाभार्थ्यांनी रुफटॉप सोलर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे केले. विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यात स्वयंपूर्ण अध्ययनाची सवय लागावी, यासाठी सायंकाळी सात ते नऊ ‘नो टीव्ही, नो मोबाईल’ ही अभिनव संकल्पना राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या. या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सदस्य सुनीता माळी व रंजना अस्वले यांनी दिल्या. शाळा तसेच अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना सकस व पोषक आहार मिळावा, यासाठी शिक्षण व महिला बालकल्याण विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना सभापती व उपसभापती यांनी दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी कुलदिप बोंगे, सर्व कार्यालय प्रमुख तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सभेतील निर्णय असे -
- गर्भलिंग निदान व स्रीभ्रूण हत्येच्या प्रकारांवर कठोर कारवाई
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना
- पावसामुळे पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी
- सायंकाळी सात ते नऊ विद्यार्थ्यांसाठी स्वयं-अध्ययनाचा उपक्रम
- शाळा व अंगणवाड्यांमध्ये आहाराची गुणवत्ता, स्वच्छतेवर भर
KGL26B10281
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.