02332
सोयाबीनला मिळेना आधारभूत किंमत
पाऊस, किडीमुळे उत्पादनात घट; मजूरटंचाईने कापणी संथ
सकाळ वृत्तसेवा
कळंबा, ता. ९ ः कळंबा शेती गटांतर्गत ४० गावांमधील शेत शिवारामध्ये सोयाबीन काढणी आणि मळणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवस उजाडल्यापासून शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. मजूरटंचाईमुळे शेतकरी कुटुंबासमवेत यंत्राच्या साह्याने मळणी करत असल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीमुळे व किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली आहे. भर म्हणून परतीच्या पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटून नुकसान होण्याची भीती आहे.
कळंबा, कात्यायनी, हणबरवाडी, पाचगाव, मोरेवाडी, दऱ्याचे वडगाव, खेबवडे, कणेरी, कणेरीवाडी, निगवे, निगवे खालसा, चुये, कावणेसह शेती गटांतर्गत चाळीसगावमध्ये यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाची साडेतीन हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात लागवड केली आहे. खरीप हंगामातील भात, सोयाबीन पिकाच्या काढणीला आणि मळणीला सुरुवात झाली आहे. मजूर टंचाईमुळे भात कापणीचे काम संथ सुरू आहे.
मात्र, सोयाबीन दरात दिवसेंदिवस घट होत आहे.
चौकट
आधारभूत किमतीला कोलदांडा
शासनाने व पणन विभागाने यावर्षी ४,८९२ रु. सोयाबीनला हमीभाव ठरवून दिला आहे. मात्र व्यापाऱ्याकडून आधारभूत किमतीला कोलदांडा दिला जात असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्याकडून साडेतीन ते चार हजार रुपये भावाने सोयाबीन खरेदीचा व्यापारी प्रयत्न करत असून वजनात काटामारी करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोयाबीनला आधारभूत किंमतही मिळत नसल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
चौकट..
तेलगळीत पिकांना भाव नाही
बाजारपेठेत गोड्या तेलाचे दर किलोमागे ३५ ते ४० रुपये वाढले आहेत. तरीही सोयाबीनसह तेलगळीत पिकांना शासनाने ठरवलेली आधारभूत किंमतही मिळत नाही. व्यापाऱ्यांकडून खरेदीच्या नावाखाली लूटमार असून पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंत आलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
कोट..
कळंब्यात सोयाबीन काढणी, मळणीला सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसामुळे व सोयाबीनला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
- नितीन निगडे, शेतकरी
कळंबा शेती गटांतर्गत चाळीस गावांमध्ये सोयाबीनचे पीक काढणीला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याशिवाय विक्री करू नये. सोयाबीन मालाची व्यापाऱ्यांना विक्री न करता शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये करावी.
- नामदेव गिरीगोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.