06392
नाधवडे (ता. भुदरगड) ः येथील मोडकळीस आलेली जुनी पाण्याची टाकी. दुसऱ्या छायाचित्रात कुचकामी नवीन पाण्याची टाकी.
...............
नाधवडेत पुन्हा अशुद्ध पाणीपुरवठा
ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात ः पाईपलाईन बदलण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. २ : नाधवडे (ता. भुदरगड) येथे दोन महिन्यांपूर्वी पिण्याचा पाण्याचा अशुद्ध पुरवठा झाल्याने कावीळसदृश साथीने अक्षरशः थैमान घातले होते. तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले असले पाईपलाईन बदलण्यासह गळती काढून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करवा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
नाधवडे गावाला कोनवडे येथील वेदगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पिण्याची पाईपलाईन कोनवडे-नाधवडे मुख्य रस्त्यांच्या बाजूने गेली आहे. ही पाईपलाईन अनेक ठिकाणी गावच्या गटारींना लागून आली आहे,तर गावांतर्गत पाईपदेखील गटारींना लागूनच टाकली आहे. त्यामुळे सतत पाईपला गळती लागू मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होते, तर काही ठिकाणी गटारींमधील अशुद्ध पाणी पाईपमध्ये शिरत असते. त्यामुळे नळाला गाळमिश्रित अशुद्ध काळे पाणी येत आहे. शिवाय पाण्यातून शेवाळ व दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दोन महिन्यांपूर्वी गावात अशुद्ध पाण्यामुळे कावीळसदृश साथीने थैमान घातले होते. त्यावेळी आरोग्य खात्याचे पथक गावात ठाण मांडून होते. कावीळसदृश साथीने बाधित शेकडो नागरिकांनी गारगोटी, मडिलगे बुद्रुक व मिणचे खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यात उपचार घेतले होते. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना औषधोपचारावर हजारो रुपयांचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दक्षता म्हणून काही ग्रामस्थ खासगी पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रांतून पाणी विकत आणून पिणे पसंत करत आहेत, तर सर्वसामान्य नागरिक मात्र अशुद्ध पाण्याचा पिण्यासाठी वापर करत आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी ग्रामपंचायतीने यावर तातडीने उपायोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
...
कोट...
नाधवडे गावास पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपची गळती काढली असून, आता सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी घाबरू नये. तरीही पाणी उकळून प्यावे.
जे . के. कांबळे, ग्रामसेवक, नाधवडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.