सर्पदंशावर होणार ‘आयजीएम’मध्ये उपचार
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ६ : आयजीएम रुग्णालय सुसज्ज होण्याच्या वाटेवर असल्याने शहर परिसरातील विविध व गंभीर असलेल्या रुग्णांना लाभ होत आहे. यापूर्वी शहरातील सर्पदंश झालेल्या नागरिकांना प्राथमिक उपचार करून सांगली, कोल्हापूर येथील रुग्णालयामध्ये पाठवण्यात येत होते. मात्र, अतिदक्षता विभाग सुरू झाल्याने सध्या आयजीएम रुग्णालयात उपचार होत आहेत. यावर्षी एकूण १०० नागरिकांना सर्पदंश झाल्याची नोंद असून त्यामधील ८६ रुग्णांवर आयजीएममध्ये यशस्वी उपचार केले आहेत. केवळ १४ रुग्णांना अन्यत्र पाठवले आहे. बहुतांशी रुग्णांवर आयजीएममध्ये उपचार होत असल्याने शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.
इचलकरंजी शहरी भाग असला तरी परिसरात ग्रामीण भाग मोठा आहे. त्यामधील अधिकतर कुटुंबांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. शेतीचे प्रमाण अधिक असल्याने या भागात बिनविषारी, निमविषारी तसेच विषारी सर्प अधिक आढळून येतात. तसेच सापांचे हक्काचे अधिवास असलेल्या क्षेत्रावर मानवाकडून अतिक्रमण होऊ लागले असल्याने सर्प-नागरिक यांचा वरचेवर सामना होत असतो. त्यामधून अनेक वेळा सर्पदंश झाल्याच्या घटना घडत असतात. दंश झाल्यानंतर सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या कालावधीमध्ये उपचार मिळणे आवश्यक असते. त्यावर त्या व्यक्तीच्या प्रकृतीची स्थिती निर्भर करत असते. मात्र, आयजीएम रुग्णालयाची पूर्वीची अवस्था पाहता सर्पदंश झालेल्या रुग्णास कोल्हापूर किंवा सांगलीमध्ये घेऊन जाणे पसंत करीत होते. मात्र, यामध्ये वेळ अधिक जात असल्याने अनेक वेळा रुग्णाची परिस्थिती गंभीर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या आयजीएममध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग सुरू असल्याने अधिकत्तर सर्पदंश झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार होत आहेत.
साप विषारी असो किंवा बिनविषारी नुसता दिसला तरी भीतीने अनेकांची बोबडी वळते. त्यामुळे साप दिसला की नागरिक कोणताही विचार न करता दगड, काठीच्या सहाय्याने मारण्याचा प्रयत्न करतात. परिणामी सर्पांच्या अनेक दुर्मिळ जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना वाचवण्यासाठी काही संस्था, सर्पमित्र प्रयत्न करताना दिसतात. या प्रयत्नात अनेक वेळा सर्पदंश झाल्याचे निदर्शनास येत असते. सर्पदंश झाल्यानंतर खासगी रुग्णालयामधील न पेलवणारा खर्च यामुळे अनेक सर्पमित्रांनी सर्प पकडणे बंद केले आहे. आयजीएममध्ये उपचार सुरू झाल्याने सर्पमित्रांना काहीसा दिलासा मिळत आहे.
----------
सर्पदंश दृष्टिक्षेप
(आयजीएममधील नोंदीनुसार)
कालावधी* एकूण*उपचार*अन्यत्र
मार्च २०२२ पूर्वी*२९* २५* ४
डिसेंबर २०२२ पर्यंत*१००* ८६*१४
--------
आयजीएम रुग्णालय सुसज्ज होत असून आधुनिक उपचार पद्धती सुरू होत आहेत. रुग्णालयात सध्या १० बेडचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग सुरू आहे. २४ बेडचा आणखी एक अतिदक्षता विभाग तयार आहे. त्यामुळे शहर परिसरातील रुग्णांवर उपचार करण्यास मदत होणार आहे.
- डॉ. दिलीप वाडकर, वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.