रिपोर्ताज...प्रसिध्दी २२ जानेवारी
फोटो- ७७७५५, ७७७०५४
............
आनंदवारी ‘प्रयाग’ची...
आध्यात्मिक अनुभूतीतून वर्षभर मिळते टवटवीत ऊर्जा
संभाजी गंडमाळे
कोल्हापूर शहरापासून आंबेवाडीमार्गे प्रयाग चिखली गाव यायला लागलं की, गुळाचा सुगंध दरवळायला लागतो. गुऱ्हाळातलं आंदण उतरायला आलेल्याचीच ही जणू चाहूल. वाऱ्याच्या झुळकेबरोबरच हा सारा सुगंधी माहौल अनुभवताना आपसूकच गुऱ्हाळघराकडं पावलं वळतात. ऊस आणि रसावर ताव मारतच मग पुढचा प्रवास सुरू होतो. कुणाचा प्रवास चालत, तर कुणी वाहनांनी प्रयागच्या दिशेनं निघालेली मंडळी आणि प्रत्येकाच्या मनात असते पंचगंगा संगमावरील स्नान व श्री दत्त दर्शनाचीच आस. एव्हाना पंचगंगेवरील पुलाजवळ पोचताच पार्किंगचा फलक लक्ष वेधून घेतो. पूल पार केला की, डाव्या बाजूला मंदिराच्या आवारात विस्तीर्ण पसरलेल्या झाडांच्या सावलीखाली विसावलेली माणसांची गर्दी दिसू लागते आणि मग या गर्दीतच आपणही हरवून जातो...
करवीर क्षेत्राच्या वायव्येला असणारं हे प्रयाग तीर्थ. येथेच कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि गुप्त सरस्वती अशा पाच नद्यांचा संगम होतो. या ठिकाणी मकर संक्रांतीपासून पुढे महिनाभर होणाऱ्या प्रयाग महापुण्य पर्वकाळात स्नान करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. १५ जानेवारीपासून या पर्वकाळाला प्रारंभ झाला आणि आता येथे भाविकांनी मोठी गर्दी केलेली. बघेल तिकडे माणसांचे जथ्थे आणि तेही सहकुटुंब यात्रेला आलेले.
भाळी टिळा अन् कागदी चक्र हीच यात्रेची ओळख
दर्शनानंतर श्री दत्त मंदिरासमोरील पारावर एकत्र बसून घरातून बांधून आणलेल्या जेवणाचा सामूहिक आनंद घेणं ही एक मोठी पर्वणीच. साहजिकच एकीकडे हे सहभोजन सुरू असते आणि त्याचवेळी बालमित्रांचा करमणुकीच्या खेळांबरोबरचा आनंदोत्सवही रंगलेला असतो. भाळी लावलेला टिळा आणि हातातील कागदी चक्र ही तर या यात्रेची खास ओळख. त्याशिवाय प्रसाद, मिठाई, नारळ आणि खेळण्यांबरोबरच खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही खरेदीचा उत्सव सुरू असतो. मंदिरात दर्शन घेऊन प्रदक्षिणा झाली की, मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या घाटावरची गर्दीही दिसते. स्नानासाठी या घाटावर लगबग सुरू असते; मात्र त्याचवेळी व्यवस्थापनाने उभारलेला खबरदारी घेण्याबाबतचा फलकही लक्ष वेधतो. स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी येथे तात्पुरता मंडप उभारून सोय केली आहे. गर्दी आणखी वाढली तर ही व्यवस्था कमी पडण्याची भीतीही अधोरेखित होत राहते. घाटावरून वर आल्यानंतर समोरच्याच एका झाडाखाली विलासराव सूर्यवंशी भेटतात. दर्शनानंतर सहभोजन घेऊन हे दाम्पत्य निवांत येथे सावलीत विसावलेले आणि बरोबर आलेली घरातील इतर मंडळी यात्रेत रममाण झालेली. श्री. सूर्यवंशी राहायला गंगावेशीत. महापालिकेच्या डबलडेकरवर ते नोकरीला होते आणि आता सेवानिवृत्त झालेले. प्रत्येक वर्षी घरातल्या साऱ्यांना घेऊन यात्रेला येतो. दर्शनाबरोबरच दिवसभर यात्रेचा आनंद घेतो आणि सायंकाळी घरी परततो. गेली कैक वर्षे हा नेम चुकलेला नाही, असं ते आवर्जुन सांगतात.
कोलोलीकरांची अशीही परंपरा...
श्री. सूर्यवंशी यांच्याशी संवाद सुरू असतानाच पुढच्या बाजूला भली मोठी गर्दी दिसते. गर्दीकडे लक्ष वेधताच तिथे भल्या मोठ्या पातेल्यात प्रसादाची सुरू असलेली लगबगही मग खुणावते. प्रसाद तयार होत असतानाच येथे नुकतेच भजन संपलेले असते आणि नैवेद्य घेऊन आरतीसाठी ही सारी मंडळी निघालेली असतात. मग त्यांच्याबरोबरच मंदिरात आरतीही होते. कोलोली (ता. पन्हाळा) येथून सहकुटुंब आलेली ही सव्वाशेहून अधिक माणसं. सारीच मंडळी आरतीनंतर प्रसादासाठी पुन्हा एकवटतात आणि येथे मग सुहास बचाटे भेटतात. ते सांगतात, ‘‘आमचं ओम दत्त चिले माऊली मंडळ. तेरा वर्षांपूर्वी प्रयाग यात्रेला सर्वांनी मिळून यायला सुरवात केली. सकाळी दहापासून प्रत्येक जण मिळेल त्या वाहनाने येथे पोचतो. काही मोठ्या वाहनांची सोयही असते. येथे आल्यानंतर दर्शनाबरोबरच भजन, विविध धार्मिक विधी होतात. एक टीम प्रसाद येथेच शिजवते. त्यानंतर सर्वजण मिळून पहिल्यांदा देवाला नैवेद्य अर्पण करतात. यावेळी सामूहिक आरतीही होते. एकत्रित प्रसादाचा आनंद घेतला जातो. त्यानंतर पुन्हा सर्वजण यात्रेचा आनंद घेतात आणि सायंकाळी पुन्हा आम्ही गावी परततो. येथून पुढेही ही परंपरा अखंडपणे पुढे सुरू राहणारच आहे. कारण वर्षातून एकदा येणारी ही आमच्यासाठीची आनंदवारीच आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.