प्रजासत्ताक दिनी जल
जीवनसाठी विशेष ग्रामसभा
संजयसिंह चव्हाण ः लोकसहभाग, पारदर्शकता वाढविण्यासाठी आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन या योजनेस लोकसहभाग मिळावा व पारदर्शकता वाढावी, या उद्देशाने प्रजासत्ताक दिनी (ता.२६) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामसभेस ग्रामपंचायत सदस्य, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. या सभेत समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीची माहितीही ग्रामस्थांना दिली जाणार आहे. याबाबतचे पत्र सर्व ग्रामपंचायतींना पाठवण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
चव्हाण म्हणाले, ‘ही ग्रामसभा अधिक लोकाभिमुख व पाण्याविषयीची जनजागृती करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या पाच महिलांना सभेस आमंत्रित केले जाणार आहे. तसेच प्रत्येक गावातील पाणी गुणवत्ता प्रशिक्षित महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिद्ध केली जाणार आहेत. ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संचातून पाणी नमुना तपासणीचे प्रात्यक्षिक आरोग्य सेवक व जलसुरक्षकामार्फत दाखविले जाणार आहे. तसेच, ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संचच्या माध्यमातून महिलांद्वारे स्रोतांची तपासणी व नळ जोडणीद्वारे येणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपद्धतीची माहिती ग्रामसभेमध्ये देण्यात येणार आहे.
ग्रामसभेत जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती जसे योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजूर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्य:स्थिती तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात येणार आहे. योजनेंतर्गत गावातील पाणीपुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक लोकवर्गणीची रक्कम व ग्रामस्थांचा हिस्सा, जमा झालेली व शिल्लक राहिलेली लोकवर्गणी याचीही माहिती दिली जाणार आहे. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने ग्रामसभेस उपस्थित राहून जल जीवनच्या कामाबाबतची माहिती संबंधितांकडून घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.