आयआरबीने केलेल्या रस्त्यांवर
डांबरी कोटसाठी ९० कोटींची मागणी
शासनाकडे प्रस्ताव सादर; ६६ रस्त्यांचा समावेश
उदयसिंग पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : आयआरबीने केलेल्या डांबरी रस्त्यांवर डांबरीकरणाचा कोट देण्यासाठी महापालिकेने शासनाकडे तब्बल ८९ कोटी ९१ लाखांचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामध्ये आयआरबीच्या ४९ किलोमीटरसह एकूण ६६ रस्त्यांचा समावेश केला आहे. यामुळे महापालिकेला शासनाच्या मदतीशिवाय रस्ते देखभाल शक्य होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेने आयआरबीसोबत केलेला करार २००८ च्या दरम्यान अंतिम करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू झाले. ते पूर्ण झाल्यानंतर जनतेने टोलविरोधात आंदोलन सुरू करून टोल रद्द करायला लावला. त्यानंतर कंपनीनेही काढता पाय घेतल्याने शहरातील प्रमुख प्रवेश मार्गावर केलेले कॉँक्रीट, तसेच डांबरी रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेवर पडली आहे. जिथे गळती वा अन्य कारणांनी रस्ता खोदायला लागला तर त्याची दुरुस्ती महापालिकेने केली; पण १४ वर्षे प्रकल्पाला झाल्यानंतर आता त्या रस्त्यांच्या देखभालीची गरज भासत आहे. या प्रकल्पातील कॉँक्रीट, डांबरी रस्ते चांगले असले तरी त्यावर कोट देणे गरजेचे झाले आहे. तो दिला नाही तर यापुढे डांबरी असलेले रस्ते हळूहळू उखडू शकतात. त्यामुळे आयआरबीसोबत झालेल्या करारात दर पाच वर्षांनी असा कोट दिला पाहिजे, असे नमूद केले होते. आता हा कोट दिला गेला तर या रस्त्यांचे आयुष्यमान वाढणार आहे. शाहू टोल ते एसपी ऑफिस चौक या रस्त्याचे डांबरीकरण केले होते.
महापालिकेने जानेवारीमध्येच आयआरबीच्या ४९ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ७१ कोटींचा निधी मिळावा म्हणून मागणी केली होती. त्यानंतर त्या प्रस्तावात शहरातील अन्य १५ मुख्य रस्त्यांचा समावेश केला. त्यासाठी लागणाऱ्या १८ कोटी २२ लाखांच्या निधीचा समावेश करून ८९ कोटी ९१ लाखांचा नवीन प्रस्ताव तयार करून महापालिकेने नगरविकास विभागाकडे पाठवला आहे. त्यात शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौक, आयलॅंडचे सुशोभीकरण करणे, पट्टे मारण्यासाठी ९० लाखांची मागणी केली आहे.
--------------
या रस्त्यांसाठी प्रस्ताव
५१
आयआरबीच्या ४९ किलोमीटरचे तसेच इतर रस्ते
१५
नंतर वाढवलेले प्रमुख रस्ते
६६
एकूण रस्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.