श्रावण मास, तीर्थाटन खास
एसटी महामंडळातर्फे योजना ः सवलतीच्या भाड्यात घेता येणार देवदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. १८ ः सुरक्षित व आरामदायी प्रवासी सेवा देणाऱ्या एसटी महामंडळातर्फे श्रावण मास विशेष तीर्थाटनाची सेवा देण्यात येणार आहेत. कोल्हापुरातून एसटीने अकरा मारुतींचे दर्शन, दत्त दर्शन व देवदर्शन अशा तीन वेगवेगळ्या तीर्थाटनांचे नियोजन केले आहे. कमी व सवलतीच्या भाड्यात जास्त प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
पाच- सात जणांच्या कुटुंबात दोघे- तिघे नोकरी व्यवसायात व्यस्त. त्यांना कुठे सहजपणे फिरायला जाणे शक्य होत नाही आणि ते फिरायला नेत नाहीत म्हणून घरातील महिला, वयोवृद्ध आई-वडील, आजी आजोबानाही घरीच बसण्याची वेळ येते. अशा वर्गाला सुरक्षितपणे पर्यटन, तीर्थाटनाचा आनंद घेता यावा. तसेच यातून एसटीला प्रवासी मिळतील, उत्पन्न वाढेल व प्रवाशांना स्वस्त देवदर्शनाचा आनंद घेणे शक्य होईल. हा यामागे हेतू आहे. केवळ घरातील व्यक्तीचे नव्हे तर गावातील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक मंडळ, मैत्रिणींचे गट यांनाही एकाच वेळी बुकींग करून व्यक्तीगत किंवा सामुदायिक प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
राज्यभरातील विविध आगारांतून यापूर्वी अशाच सहली एसटी महामंडळाने घडविल्या आहेत. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला लाभला. त्यापाठोपाठ कोल्हापुरातून अशी तीर्थाटन सुविधा सुरू झाली. आठवड्यातील दोन दिवस मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांच्या मागणी व संख्येनुसार तीर्थाटनासाठी बस सोडल्या जातात. पंधरा दिवसांत एसटीच्या पाच बस तीर्थाटनासाठी गेल्या. अडीचशे भावकांनी त्याचा लाभ घेतला आहे.
प्रतिसाद वाढत राहिला तर तीर्थाटन पर्यटन सुविधेच्या आणखी गाड्या नियमितपणे सोडल्या जाणार आहेत. प्रसिद्ध धार्मिक स्थळांसोबत नवीन प्रेक्षणीय स्थळे, निसर्ग दर्शन घडविण्यावर एसटी महामंडळ भर देणार आहे.
तीर्थाटन असे
देवदर्शन बस
-कोल्हापूर-गाणगापूर, अक्कलकोट (मुक्काम), तुळजापूर,पंढरपूर- कोल्हापूर
- तिकीट प्रती ः व्यक्ती १ हजार ३५० रुपये
दत्तदर्शन सहल
-कोल्हापूर- औदुंबर, नृसिंहवाडी, खिद्रापूर व आळते
-तिकीट ः प्रती व्यक्त ४०० रूपये
आकरा मारूती दर्शन सहल
-कोल्हापूर मनपाडळे, जुने पारगाव, शिराळा, बहे बोरगाव, शहापूर, मसूर, चाफळ, शिंगणवाडी, माजगाव, उंब्रज
- तिकीट ः प्रतीव्यक्ती ५०० रूपये
कोट
वरील सर्व सहलींसाठी महिला सन्मान योजनेतून तिकिट भाड्यात ५० टक्के सवलत तर अमृत ज्येष्ठ नागरीक योजनेत ७५ वर्षावरील ज्येष्ठाना मोफत प्रवास सवलत आहे. पैशाची बचत व तिर्थाटनाचा आनंद घेता येत असल्यामुळे योजनेला प्रतिसाद वाढत आहे. प्रवासी प्रतिसाद वाढत राहिल्यास आणखी नव्या मार्गावरही एसटी सहलींचे नियोजन करणार आहे.
-अभिजीत भोसले, मुख्य जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.