फोटो
24269
गोकुळ शिरगाव ः येथील एमआयडीसीमध्ये होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी शेजारी (डावीकडून) सुजित चव्हाण, धनंजय महाडिक, हरिश्चंद्र धोत्रे, धैर्यशील माने, दीपक चोरगे, ऋतुराज पाटील, राजेखान जमादार आदी.
कोल्हापूरला मोठा उद्योग आणूया
उदय सामंत : ‘गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले’मधील कामांचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर/उजळाईवाडी, ता. १८ ः येथील एमआयडीसींमधील पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यावर भर दिला. अन्य प्रश्नही लवकर सोडविले जातील. येथील औद्योगिक क्षेत्राला आणखी गती देण्यासह रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्नातून कोल्हापूरला मोठा उद्योग आणूया. त्यासाठी लोकप्रतिनिधी, उद्योजकांनी साथ द्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले, शिरोली औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) मध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत. या कामांच्या गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील भूमिपूजनावेळी ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘‘उद्योग खात्याचा मंत्री झाल्यानंतर कोल्हापूरच्या औद्योगिक वसाहतींतील पायाभूत सुविधांसाठी १०० कोटी देण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात १२० कोटी दिले. कोल्हापूरला मोठे उद्योग यावेत, यादृष्टीने एमआयडीसींमधील पायाभूत सुविधा भक्कम केल्या जात आहे. आता मोठ्या प्रकल्प येण्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न करूया. अन्य प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र बैठक घेवू.’’
महाडिक म्हणाले, ‘‘राज्यातील यापूर्वीचे अडीच वर्षात स्थगितीचे सरकार होते; मात्र, आताच्या वेगवान महायुती सरकारकडून गतिमान काम होत असून त्याचा अनुभव कोल्हापूरला आला आहे.’’ माने म्हणाले, ‘‘कोल्हापूरच्या औद्योगिक इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी १०० कोटींचा निधी मिळाला आहे. उद्योजकांना बळ देण्याचे काम सामंत यांनी केले. त्यांनी आता विकासवाडीतील नव्या एमआयडीसीची लवकर सुरूवात करावी.’’ पाटील म्हणाले, ‘‘उद्योजकांचे प्रश्न सोडवून त्यांना बळ दिल्याबद्दल मी उद्योगमंत्र्यांचे आभार मानतो.’’
‘गोशिमा’चे अध्यक्ष दीपक चोरगे, ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी मंत्री सामंत यांनी दिलेल्या १२० कोटींचा निधीने पाठबळ मिळाल्याचे सांगितले. सन २०१७ पासूनची जीएसटीची व्याजासह वसुली थांबवावी. पर्यावरण कर सवलतीमधील त्रुटी दूर करण्याची मागणी धोत्रे यांनी केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, ‘कोल्हापूर चेंबर’चे संचालक विज्ञानंद मुंढे, ‘स्मॅक’चे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, उद्योजक सचिन शिरगावकर, सत्यजित जाधव, स्वरूप कदम, राजीव आवटे, नयन गारगोटे, शिवसेना शिंदे गटाचे सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, राजेखान जमादार, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, उपअभियंता अजयकुमार रानगे, रणजित बिरंजे, एस. व्ही. अपराज, कार्यकारी अभियंता अतुल ढोरे, दिलीप जोगवे, सुधीर नागे, ए. आय. नाईक उपस्थित होते. मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी अभियंता राहुल तिडके यांनी आभार मानले.
नव्या ‘एमआयडीसी’साठी जागा शोधा!
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या मध्यभागी एक हजार एकरावर मोठी एमआयडीसी उभा करावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. त्यावर अधिकाऱ्यांनी या परिसरात जागेचा शोध सुरू करावा. जागा मिळाल्यानंतर एमआयडीसीला मंजुरी देऊ, असे मंत्री सामंत म्हणाले.
गोकुळ शिरगाव, कागल एमआयडीसीत ४० कोटींची कामे
गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील मुख्य चौपदरी रस्त्याचे दुभाजक उचलणे, पदपाथ व आवश्यक डांबरीकरणासह मजबुतीकरण, तर कागल-हातकणंगले, गोकुळ शिरगाव, शिरोली एमआयडीसीचे पाणीपुरवठा पंपिंग केंद्र सिद्धनेर्ली व जलशुद्धीकरण केंद्र कागल येथील पंपिंग मशिनरी बदलणे या सुमारे ४० कोटींच्या कामांची सुरूवात करण्यात आल्याचे मुख्य अभियंता वानखेडे यांनी सांगितले. ही कामे १५ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याची ग्वाही गणेश खाडे यांनी दिली.
‘सकाळ’ने मांडलेल्या भूमिकेला बळ
राज्य सरकारने कोल्हापुरात मोठा उद्योग सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, अशी उद्योजकांची अपेक्षा आणि भूमिका ‘सकाळ’ने आजच्या ‘कोल्हापूरला मोठा उद्योग द्या’ या बातमीतून मांडली. त्याला खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, उद्योजकांनी बळ देत मंत्री सामंतांकडे आग्रही मागणी केली. त्यांनीही असे उद्योग येण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
स्थानिकांना रोजगार द्या
ज्या शेतकऱ्यांनी एमआयडीसीसाठी जागा दिली आहे, त्यांच्या मुलांना, स्थानिक लोकांना रोजगार द्या. त्यांना नाचवू नका. याबाबत भान राखा. शिक्षण, आरोग्यविषयक सुविधांसाठी सीएसआर फंड द्या, असे आवाहन सामंत यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.