‘उज्ज्वल भविष्यासाठी
विज्ञाननिष्ठ बना’
गडहिंग्लज : जे दिसते ते तसेच असते याला बघणे म्हणतात. पण, जे दिसते ते तसेच का दिसते असे बघणे याला विज्ञाननिष्ठा म्हणतात. त्यामुळे उज्ज्वल भविष्यासाठी विज्ञाननिष्ठ बना, असा सल्ला भाभा अणुसंशोधन केंद्राचे निवृत्त वरिष्ठ निजीसचिव व साहित्यिक सतीश सोळांकुरकर यांनी दिला.
येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान दिनाची सांगता व पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. मुख्याधिकारी संजय गायकवाड अध्यक्षस्थानी होते. सायन्स सेंटरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रीतम कापसे, डॉ. सुनीता चव्हाण, डॉ. किरण हत्ती यांचीही भाषणे झाली.
-------------
नरेवाडीत
बक्षीस वितरण
महागाव : ज्ञानसागर वाचनालय नरेवाडीमार्फत विद्यामंदिर नरेवाडी येथे बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. भाषण व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केले. नरेवाडीचे सरपंच अंकुश रणदिवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा डॉ. शीतल पोवार, माजी सरपंच राजकुमार कुंभार, वाचनालयाचे अध्यक्ष आप्पा निलवे, संभाजी पाटील, आदी उपस्थित होते.
-----------
‘घाळी’मध्ये
रोजगार प्रशिक्षण
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात माजी विद्यार्थी असोसिएशनतर्फे रोजगार प्रशिक्षण शिबिर घेतले. आपल्याकडील कौशल्ये विकसित करून रोजगारपूरक कुशल मनुष्यबळाची जोड दिल्यास आपणास हमखास चांगल्या पगाराच्या व पदाच्या नोकऱ्या मिळू शकतात, असे मत मार्गदर्शक प्रशांत कित्तूरकर यांनी व्यक्त केले. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश देवगोंडा उपस्थित होते. प्रशिक्षणात मुलाखत कौशल्य, मुलाखतीची पूर्वतयारी, परिचयपत्र, आदींविषयी कित्तूरकर यांनी मार्गदर्शन केले. १३८ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
---------------
बांधकाम कामगारांनी
भांड्यांचा लाभ घ्यावा
गडहिंग्लज : राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या भांडी संचाचा लाभ बांधकाम कामगारांनी घ्यावा, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष चिकोडे व उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी यांनी केले आहे. बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून विविध लाभ दिले जातात. कामगार कामानिमित्त नेहमी स्थलांतरित होत असतात. यामुळे त्यांना ३० नगाच्या भांडी संचाचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नोंदणीकृत कामगारांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
------------
सांस्कृतिक भवनाची
शिंपी समाजाची मागणी
गडहिंग्लज : सांस्कृतिक भवन बांधून मिळावे, अशी मागणी येथील गडहिंग्लज तालुका नामदेव शिंपी समाज मंडळातर्फे केली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना याबाबतच्या मागणीचे निवेदन दिले. श्री. मुश्रीफ गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते. यावेळी शिंपी समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र महाडीक, भारत कोळेकर, उपाध्यक्ष गजानन काकडे, सचिव अरुण खटावकर, आदी उपस्थित होते.
-------------
शिंदे शिक्षणशास्त्रला बी++ मानांकन
गडहिंग्लज : येथील डी. के. शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला नॅककडून बी++ मानांकन मिळाले. विशेष म्हणजे डी. के. शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिवाजी विद्यापीठातंर्गत बी++ मानांकन मिळवणारे पहिले शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे. शिवाय विनाअनुदानित महाविद्यालय असूनही नॅकच्या प्रक्रियेला तिसऱ्या वेळी सामोरे गेले आहे.
---------
मांगनूर तर्फ सावतवाडीत
स्वच्छता अभियान
नेसरी : मांगनूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे संत निरंकारी मंडळ वाघराळी शाखेतर्फे स्वच्छता अभियान झाले. अभियान अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी, भावेश्वरी मंदिर परिसरासह परंपरागत जलस्रोतांची स्वच्छता केली. सरपंच शारुबाई चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नावलगी, शलाका शिंगटे, एम. एस. पवार, आदी सहभागी झाले होते.
-----------
01861
जिल्हा उपाध्यक्षपदी
विवेक पाटील
कोवाड : येथील विवेक पाटील यांची दुसऱ्यांदा चंदगड विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे. जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, जिल्हा संघटक बाळा शेडगे यांच्या हस्ते गडहिंग्लज येथे झालेल्या कार्यक्रमात निवडीचे पत्र दिले. ते मनसेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत आहेत.
------------
व्यंकटराव देसाईंचा स्मृती दिन
कोवाड : स्व. व्यंकटराव देसाई यांनी कोवाड येथे दि किणी कर्यात शिक्षण संस्थेचा पाया घातला. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला. ६३ वर्षांत हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेतून बाहेर पडले. देसाई यांचे समाजाला दिशा देणारे कार्य आजही सर्वांना प्रेरणादायी ठरले आहे, असे मत प्राचार्य एस. टी. कदम यांनी व्यक्त केले. येथील श्रीराम विद्यालयात दि किणी कर्यात शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. व्यंकटराव पर्वतराव देसाई यांचा स्मृती दिन साजरा झाला. त्यावेळी प्राचार्य कदम बोलत होते. देसाई यांच्या पुतळ्याचे पूजन प्राचार्य कदम यांच्या हस्ते झाले. विठ्ठल व्हन्याळकर, बी. एस. तरवाळ, सुधाकर वांद्रे, लक्ष्मण व्हन्याळकर, आदी उपस्थित होते. स्वागत विठ्ठल व्हन्याळकर यांनी केले.
----------
‘मुख्यमंत्री माझी’
साळगाव शाळा दुसरी
आजरा : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, स्पर्धेत आजरा तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा गटात विद्या मंदिर साळगाव शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. तालुकास्तरीय समितीमधील सदस्य आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, उतूरचे केंद्र मुख्याध्यापक संजय पोवार यांनी मूल्यांकन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.