इचलकरंजीत होणार १६ प्रभाग
महापालिका निवडणूक ः शेवटचा प्रभाग पाच सदस्यांचा असणार
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३ ः येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी शासन निर्णयानुसार चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय शासन पातळीवर घेतला आहे. या निर्णयामुळे इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण १६ प्रभागांची निर्मिती होणार आहे. प्रत्येक प्रभाग चार सदस्यीय असणार आहे. यामुळे एका प्रभागातील मतदारांची संख्या ही १६ ते २० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना विस्तृत असणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अनुभवी उमेदवारांसह नवीन इच्छुकांना कसरत करावी लागणार आहे.
शतकोत्तर असलेल्या इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले आहे. पावणे दोन वर्षे स्थापनेपासून महापालिकेवर प्रशासक राज आहे. त्यामुळे महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयानुसार महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रभागरचना होणार आहेत. त्यानुसार इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागरचना होणार आहे. इचलकरंजी शहराची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही २ लाख ९२ हजार इतकी असून ही ‘ड’ वर्ग महापालिका आहे. महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार ३ लाख लोकसंख्या असलेल्या ‘ड’ वर्ग महापालिकेची सदस्यसंख्या ६५ इतकी असावी असे नमूद आहे.
यानुसार प्रभागरचना झाल्यास इचलकरंजीमध्ये एकूण १६ प्रभागांची निर्मिती करावी लागणार आहे. यामध्ये १५ प्रभाग हे चार सदस्यीय असणार असून शेवटचा प्रभाग हा पाच सदस्यीय असणार आहे. इचलकरंजीची लोकसंख्या पाहता एका प्रभागात किमान १६ ते कमाल २० हजार इतकी लोकसंख्या असणार आहे. तसेच एका प्रभागाचे भौगोलिक क्षेत्रफळही मोठे असणार आहे. यामुळे आता महापालिकेसाठी इच्छुक व यापूर्वीच फिल्डिंग लावून बसलेल्या उमेदवारांची मात्र तारेवरची कसरत होणार आहे. प्रभागातील प्रत्येक मतदारांसमवेत संपर्क साधण्यासाठी व्यापक नियोजन करावे लागणार आहे.
----
नवीन इच्छुकांसमोर आव्हान
अपवाद वगळता आतापर्यंत किमान दोन ते तीन सदस्यीय प्रभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी नगरसेवकांची त्यांच्या प्रभागामध्ये ओळख व जनसंपर्क आहे. त्यांना यामध्ये कष्ट कमी पडणार आहेत. पण नव्यानेच महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या इच्छुकांसाठी मात्र मोठा आटापिटा करावा लागण्याची शक्यता आहे. प्रभागातील सहकारी उमदेवार निवडतानाही गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.