आनंददायी स्वरवाटा
भारतीय संगीताला एक समृद्ध परंपरा आहे. आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसांचा हा पुरावाच म्हणावा लागेल. हजारो वर्षांपासून ते अत्याधुनिक आणि वैविध्यपूर्ण फॉर्ममध्ये उमलतात. आताही हे संगीत आपल्यासमोर येत असते. भारतीय संगीताचा विचार करताना काळ, इतिहास आणि भारतीय लोकरचना याचा विचार होतोच. भारतीय संगीत दोन मुख्य परंपरांमध्ये विभागले गेले आहे. उत्तरेकडील हिंदुस्थानी संगीत आणि दक्षिणेकडील कर्नाटक संगीत. तरीही यामध्ये अनेक प्रादेशिक फरक आहे.
संगीताच्या केंद्रस्थानी राग आणि ताल या संकल्पना असतात. संगीतातील राग विशिष्ट भावना आणि अभिव्यक्त होण्याचे काम करतो. प्रत्येक राग एका विशिष्ट मूडशी, दिवसाची वेळ किंवा ऋतूशी संबंधित असतो, जो संगीतकाराला भावनिक बांधून घालतो. ताल हे रागाचे लयबद्ध प्रतिरूप असते. हे बीट्सचे एक चक्र आहे जे एखाद्या रचनेला रचना आणि गती प्रदान करते. राग आणि ताल यांच्यातील एकरुपताच भारतीय संगीताचा कणा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
भारतीय संस्कृतीत संगीत हे सामवेदापासून सुरू झाल्याची मांडणी संगीत क्षेत्रातील अभ्यासक करतात. सामवेद गाऊन सांगितला असेही काही तज्ज्ञ सांगतात. वेदांच्या उत्पत्तीपासूनच संगीताचा सुरू झालेला हा प्रवास देशात आलेल्या अनेक राजवटींमध्ये सातत्याने बदलत गेला. अनेक नवीन गोष्टींची त्यात भर पडत गेली. विविध राजवटींच्या संस्कृतींचा परिणाम त्यावर झाला. पूर्वी संगीतकलेला राजाश्रय मिळाला आणि आता त्याला लोकाश्रयही मिळत आहे. तोच मुळी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज, विद्वान कलावंतांच्या संगीत तपश्चर्येच्या जोरावर. मानवी अनुभवांचा विचार केल्यास कला आणि शास्त्र एकमेकांस पूरक असतात. शास्त्र बुद्धिनिष्ठ तत्त्वावर, तर कला ही भावनानिश्चिती व कृती या तत्त्वावर अवलंबून आहे. भारतीय प्राचीन संस्कृतीत संगीत आणि संगीतशास्त्राला महत्त्व आहे.
आधुनिक सांस्कृतिक मूल्यांच्या आविष्कारांचे सामर्थ्य संगीत क्षेत्रात आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय विद्यांचा अभ्यास सुरू झाला. भारतीय संगीतशास्त्रावर विचार तेव्हापासूनच सुरू झाला. यावर अनेक संशोधन, लिखाण झाले. संगीतावर अनेक ग्रंथ आले, येत आहेत. अभ्यासक चिकित्सक पद्धतीने मांडणी करून संगीतशास्त्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. संगीताच्या पोषणासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी अनेकांनी आपले आयुष्य वेचले. दोन स्वर कानावर पडले की, त्याला अनुसदन होते. वादी, संवादी, अनुवादी आणि विवादी हे नैसर्गिक स्वर तयार होत असतात. स्वर, वर्णालंकार, गायकीची पद्धत असे विवेचनही केले जाते. सिद्ध असलेली रागसिद्ध आणि विविध साधने भारतीय संगीताला प्राप्त झाली. त्यात कृत्रिमता मुळीच नाही. भारतीय संगीत सुधारणेवर भर देते. संगीतकारांना रागाची खोली दाखविण्याची संधी यात मिळते आणि ते उत्स्फूर्त आणि अद्वितीय सादरीकरण असते. हा पैलू केवळ संगीतकाराच्या गुणवत्तेचेच प्रदर्शन करत नाही, तर प्रत्येक कामगिरीला ताजेपणा आणि व्यक्तिमत्त्वही देते.
भारतीय संगीत स्थिर नाही. परंपरेचा आदर करत नावीन्याचा स्वीकार करणारा हा एक गतिमान आणि विकसित प्रकार आहे. भारतीय संगीताचा विकास शास्त्रीय ते लोक आणि समकालीन अशा विविध प्रकारांतून आणि शैलींमधून दिसून येतो. भारतीय संगीत हा एक आध्यात्मिक प्रवास आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे. हे भारतीय तत्त्वज्ञान, धर्म आणि दैनंदिन जीवनाशी सखोलपणे गुंतलेले दिसते. भारतातील संगीतातून परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग किंवा वैश्विक आत्म्याशी जोडण्याचा मार्ग म्हणून आध्यात्म क्षेत्रातील लोक पाहतात. भजन आणि कीर्तन ही त्यातीलच काही शैली. परमात्म्याचे आवाहन आणि उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने ते म्हटले जाते.
संगीत क्षेत्राची व्याप्ती, परंपरा खूप मोठी आहे. या अनुषंगानेच सकाळ कोल्हापूर युनिटने या विषयाला वाहिलेला स्वराभिषेक दिवाळी अंक २०२२ मध्ये प्रकाशित केला होता. एखाद्या विषयाला वाहिलेला दिवाळी अंक असावा या कोल्हापूर युनिटच्या परंपरेतील एक पुढचा भाग. तो पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला तर त्यास एक संदर्भमूल्य प्राप्त होईल, असा विचार संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी ‘सकाळ’कडे मांडला होता. तो आता प्रत्यक्षात उतरल्याचा आम्हास आनंद होत आहे.
पंडित विनोद डिग्रजकर यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. श्री. डिग्रजकर हे संगीत क्षेत्रातील तपस्वी व्यक्तिमत्त्व. आम्ही या स्वराभिषेकची संकल्पना घेऊन त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी त्वरित यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी या अंकासाठी दिग्गज सहकाऱ्यांना सहकार्य करण्याचेही आवाहन केले. त्यांच्या आणि ‘सकाळ’च्या विनंतीला मान देऊन पंडित संजीव अभ्यंकर, डॉ. श्रुती सडोलीकर, पंडित हेमंत पेंडसे, पंडित सत्यशील देशपांडे, मंजिरी आलेगावकर, डॉ. विकास कशाळकर, डॉ. पौर्णिमा धुमाळे, शुभांगी बहुलीकर, पंडित सुहास व्यास, डॉ. समीर दुबळे, डॉ. विनोद ठाकूर-देसाई, राजेंद्र कंदलगावकर, डॉ. धनंजय दैठणकर, डॉ. चैतन्य कुंटे, चंद्रकांत लिमये, डॉ. राम देशपांडे, पतंजली मादुस्कर, अरुण द्रविड या दिग्गजांनी स्वराभिषेकमध्ये सहभाग नोंदवून याला एक वेगळीच उंची दिली. जयपूर घराण्यातील बंदिश, संगीतातील घराणी आणि वर्तमान, ख्याल गायकी आणि वैशिष्ट्ये, मैफलींचे अंतरंग, संगीतातील सौंदर्यशास्त्र, अध्ययन, अध्यापन, सादरीकरण व जनसंपर्क, भारतीय संगीताची व्याप्ती, रियाज संतूर, संतुराच्या स्वरवाटा अशा विविध विषयांवर मांडणी या माध्यमातून करता आली.
स्वराभिषेक म्हणत असताना स्वरांचा अभिषेक होणे तितकेच महत्त्वाचे असते. अभिषेकांच्या स्वरातून येणारा प्रत्येक शब्द हा स्पंदने निर्माण करून आनंद, समाधानाकडे नेणारा असतो. याचा विचार करून स्वराभिषेक हे पुस्तक केवळ वाचायचे नाही, तर वरील सर्व दिग्गजांची मैफल ऐकायचीही, असेही ठरविले. वाचनाचा आनंद घेण्याबरोबरच मैफलीचाही आस्वाद देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आजकाल पुस्तक ऐकण्याचा जमाना आहे. त्यामुळेच आम्ही, वाचनही करा आणि या वरील सर्व दिग्गज लेखांच्या संगीताच्या मैफीलीचा आनंदही घ्या, असा दुहेरी आनंद देण्याचा प्रयत्न करत आहोत. वाचकांना, संगीतप्रेमींना हे निश्चितच आवडेल, यात शंका नाही. या वेगळेपणामुळे स्वराभिषेक दिवाळी अंकाला मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे उत्कृष्ट विशेषांक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आपण स्वीकारलेला मार्ग योग्य होता, हे सांगणारी शाबासकची थाप होती.
कोणत्याही गोष्टी नुसती संकल्पना मांडून चालत नाही, तर त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी अनेकांची गरज असते. यामध्ये आमचे सकाळ कोल्हापूरचे उपमुख्य बातमीदार संभाजी गंडमाळे, उपसंपादक सुजितकुमार पाटील यांनी लेखकांशी संपर्क साधण्यापासून संपादन करण्यापर्यंतचा धागा गुंफला. वृत्तसंपादक प्रसाद इनामदार यांनीही यात योगदान दिले. सकाळ प्रकाशनचे आषुतोष रामगिरी यांच्यासमोर दिवाळी अंक पुस्तकरुपात येण्याबाबत संकल्पना मांडल्यावर नेहमीप्रमाणे त्यांनी होकार दिला. त्यांच्या सर्व टीमने सहकार्य केल्यानेच स्वराभिषेक दिवाळी विशेषांक पुस्तक स्वरुपात आपल्या समोर येत आहे. याचा आपण आनंद घ्यावा, आपल्या कुटुंबीयांना, आप्तेष्ठांनाही याबाबत सांगावे आणि संग्रीतप्रेमींना हे पुस्तक भेट स्वरुपात देऊन त्यांनाही स्वरांच्या या आनंदलहरीत सहभाग करून घ्यावे.
-निखिल विद्याधर पंडितराव.
संपादक (कोल्हापूर युनिट).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.