फोटो 84906
नाटक आता थेट रसिकांपर्यंत!
कलासक्त मंडळींचे पाठबळ, शहरात रुजतेय इंटीमेट थिएटर, ओपन माईक कल्चर
संभाजी गंडमाळे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः मुळात नाटकाकडं पोरं हल्ली वळतात कुठे? हौसेखातर नवे काही करायचं तर थिएटरचं भाडेच परवडत नाही. नाटकाला प्रेक्षक तरी कुठे येतोय? शंभर-दीडशे प्रेक्षकांसाठीचं बॉक्स थिएटर कधी होणार? अशी केवळ चर्चा न करता आता नवी पिढी नवे प्रयोगही करू लागली आहे आणि त्यांचं नाटक थेट रसिकांपर्यंत पोहोचू लागलं आहे. शहरात इंटीमेट थिएटर, ओपन माईक कल्चर रुजत असतानाच कलासक्त मंडळींनीही त्यांच्या या प्रयत्नांना स्वतः पुढाकार घेऊन पाठबळ दिले आहे.
‘स्पेस’ आहे तर नाटक आहे...
कुठलेही नाटक असो किंवा कलाविष्कार त्यासाठी ‘स्टेज'' महत्त्वाचे असते. अर्थात, मोकळी जागा ‘स्पेस’ आवश्यक असते. ही स्पेसच आता काही कलासक्त मंडळींनी उपलब्ध केली आहे. राजारामपुरीतील आर्किटेक्ट शीतल पाटील, सचिन पाटील यांनी मंथन डिझाईन स्टुडिओच्या माध्यमातून कलाकारांना पाठबळ दिले आहे. त्यांच्या स्टुडिओत किमान शंभर ते सव्वाशे प्रेक्षकांना प्रायोगिक नाटकांचा अनुभव घेता येतो. प्रेक्षकांनाही विनामूल्य प्रवेश असतो. फक्त नाटक संपल्यानंतर कलाकारांना पाठबळ म्हणून त्यांनी तेथे ठेवलेल्या बॉक्समध्ये ऐच्छिक रक्कम ठेवावी, एवढीच अपेक्षा असते. कॅफे कम्युन बीजनेही अशीच स्पेस कोणत्याही मोबदल्याशिवाय कॅफेमध्ये उपलब्ध केली आहे. ही काही प्रातिनिधिक उदाहरणं. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, परिवर्तन कला फाउंडेशनच्या माध्यमातूनही असे काही प्रयोग आवर्जुन होतात.
केवळ दहा बाय
वीस फुटांची जागा द्या...
तुम्ही केवळ दहा बाय वीस फुटांची जागा दिली तर आम्ही तुमच्याकडे येऊन नाटक सादर करतो, अशी संकल्पनाही आता पुण्या-मुंबईत पुढे आली आहे. कमीत कमी साधनांचा वापर आणि कमीत कमी कलाकारांचा संच घेऊन ही संकल्पना रुजते आहे. त्यामुळे खर्चावरही नियंत्रण येते आणि नवे प्रयोग करण्याची आणि अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्टही साध्य होत आहे.
कोट
मराठी रंगभूमीवर सतत काही तरी वेगळं झालं पाहिजे, अशी आपली अपेक्षा असते. मात्र, प्रेक्षक म्हणून केवळ नाटक बघणं एवढीच आपली भूमिका असते. आपणही रंगभूमीसाठी काय करू शकतो, या विचारातून मंथन स्टुडिओ साकारला आहे. येथे नवोदित मंडळी येतात. प्रायोगिक नाटकांचे, कलाविष्काराचे नव नवे प्रयोग सादर करतात. त्यातून नक्कीच सकस नवनिर्मिती होत असल्याचा आनंद आहे.
- शीतल पाटील, आर्किटेक्ट
कोट
नवी पिढी आपापल्या नोकऱ्या, व्यवसाय सांभाळून रंगभूमीवर वेगळे प्रयोग करते आहे. त्यामुळे आर्थिक गणितं जमवताना नाकीनऊ येते. या पार्श्वभूमीवर त्यांना मिळणारी ‘स्पेस’ प्रोत्साहन देणारी आहे. मुळात अशा पद्धतीच्या आविष्कारामुळे प्रेक्षकांना अधिक जवळून अनुभव घेता येतो आणि तो अनुभव काही औरच असतो. ‘ओपन माईक’च्या माध्यमातून प्रेक्षकांनाही उत्स्फूर्तपणे आपली प्रतिभा येथे सादर करण्याची संधी मिळते.
- सतीश तांदळे, लेखक, रंगकर्मी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.