08245
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत ः येथे शुक्रवारी झालेल्या गोकुळच्या वार्षिक सभेत एकच गदारोळ झाला. यामध्ये पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. (आणखी वृत्त आणि छायाचित्रे पान २)
वाढावा फोटो.........
08246
कागल पंचतारांकित वसाहत : गोकुळच्या सभेत पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यात एकाचा शर्ट फाटला.
गोकुळच्या वार्षिक सभेत एकच गोंधळ
घोषणा-प्रतिघोषणांनी सभागृह दणाणले, पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : गोकुळच्या आज झालेल्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकच गदारोळ झाला. सत्तारुढ आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांच्या घोषणांबाजीमुळे सभागृह दणाणले. दरम्यान, सत्तारुढांनी या गदारोळात ठराव मंजूर झाल्याच्या घोषणा दिल्या. त्याचवेळी विरोधकांनी समांतर सभा घेत सर्व ठराव नामंजूर केले. कार्यकर्त्यांच्या या सर्व गोंधळात दूध संघाच्या हजारो सभासदांनी मात्र ही सभा शांततेत ऐकूण घेतली.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कागल-हातकणंगले पंचतारांकित वसाहत येथील गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे झाली. गोकुळचे महाविद्यालय रद्द करा, वासाच्या दुधाचे झाले काय, आदी प्रश्नोबाबत गोकुळ संचालिका शौमिका महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या जोरदार घोषणा-प्रतिघोषणांमुळे गोकुळच्या आजच्या वार्षिक सभेत एकच गदारोळ झाला. शौमिका महाडिक यांच्यासोबत आलेल्या सभासदांनी महिलांऐवजी पुरुष सभासदांच्या आसन व्यवस्थेकडे जावे, असा आग्रह धरणारे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट आणि धक्काबुक्की झाली. परिणामी, सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
सभा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे आधीच संचालिका शौमिका महाडिक कार्यकर्त्यांसोबत सभागृहाजवळ आल्या. तेथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, सौ. महाडिक यांनी महिलांसाठी तयार केलेल्या आसन व्यवस्थेच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी पोलिसांनी त्यांना सोडले; मात्र, इतर कार्यकर्त्यांनी पुरुष सभासदांसाठी असणाऱ्या आसन व्यवस्थेकडे जाण्यास सांगितले. कार्यकर्त्यांनी सौ. महाडिक यांच्यासोबतच जाण्याचा आग्रह धरल्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यातून काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत आत गेले. त्यांनतर उर्वरित कार्यकर्त्यांना पुरुषांच्या आसन व्यवस्थेकडे पाठवण्यात आले. यातील अनेक कार्यकर्ते पुन्हा महाडिक यांच्यासोबत जाण्यासाठी बॅरिकेडस् आणि पोलिसांचा बंदोबस्त झुगारून आत येऊ लागले. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट आणि धक्काबुक्की झाली. सभा सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी नामंजूर-नामंजूर अशा घोषणा देत नामंजूरच्या फलकासह शौमिका महाडिक आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे झेंडे फडकवण्यास सुरुवात केली. महाडिक यांच्या कार्यकर्त्यांचे झेंडे पाहताच आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही सतेज पाटील यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, संघाचे संस्थापक संचालक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे फलक झळकावत जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.
दरम्यान, अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविक करण्यास सुरुवात केल्यानंतर महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. गोकुळचे कॉलेज कोणाच्या घशात घालणार, वासाच्या दुधाचे झाले काय झाले, गोकुळ फायदा गेला कुठे आहे आदी प्रश्नांची सरबत्ती कार्यकर्त्यांनी स्पीकरवरूनच केली. महाडिक यांचे कार्यकर्ते प्रश्न विचारत असताना पाटील यांच्याही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या जोरदार घोषणा देत अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याही विजयाच्या घोषणा दिल्या. याचवेळी व्यासपीठासमोर महाडिक-पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करत हजारो सभासदांनी मात्र शांतपणे सभा ऐकून घेतली. उत्तरोत्तर कार्यकर्त्यांचा जोशही कमी होत गेला.
* झेंडे तीन-चार महिन्यांनी नाचवा
महाडिक गटाचे कार्यकर्ते सभेत आक्रमक होत सभागृहात झेंडे फिरवत होते. याचवेळी अध्यक्ष डोंगळे यांनी त्यांचा समाचार घेत तुम्हाला जे काय झेडें नाचवायचे आहे ते तीन-चार महिन्यांनी निवडणुका आल्यानंतर नाचवा. आता ही तुमची ट्रायल कशाला, असा सवाल केला. हा संघ सभासदांच्या हितासाठी काम करतो आणि त्याचे धोरण ही सभासदच ठरवतो. त्यामुळे या ठिकाणी कोणालाही पाठी घालायचे काम होणार नाही, असेही डोंगळे यांनी स्पष्ट केले.
* कार्यकर्त्याचा शर्ट फाटला
पोलिस आणि महाडिक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यामध्ये एका कार्यकर्त्याचा शर्ट फाटला. तरीही, तो कार्यकर्ता महाडिक यांच्यासोबत शेवटपर्यंत घोषणा देत राहिला.
* कार्यकर्ताचा केला व्हॉलीबॉल
पुरुष सभासद आसनास्थळी बसलेल्या एका कार्यकत्याला महाडिक यांच्याकडे जायचे होते. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्याला उचलून बॅरिकेडस् पलीकडे टाकण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पोलिसांनीही त्याला पुन्हा कार्यकर्त्यांकडे ढकलून दिल्याने त्या कार्यकर्त्यांचा व्हॉलीबॉलच केला होता.
* शौमिका महाडिकांचे शक्तिप्रदर्शन
शौमिका महाडिक शिरोलीतूनच कार्यकर्त्यांसमेवत वाहनांच्या ताफ्यात आल्या. कार्यकर्त्यांच्या हातात माजी आमदार महादेवराव महाडिक आणि शौमिका महाडिक यांचे झेंडे होते. जोरदार घोषणा देत ते सभागृहापर्यंत आले. या निमित्ताने शौमिका महाडिक यांनी शक्तिप्रदर्शन केले.
* सर्व प्रश्नांची उत्तरे देणार
सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. ठराविक जणांकडून घातल्या जाणाऱ्या गोंधळामुळे इतरांना सभासदांना त्याचा त्रास होत आहे. कोणाला कितीही प्रश्न विचारायचे आहेत तेवढे विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधिल आहोत, असे प्रतिपादन गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले; मत्र विरोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.