फोटो 08201
सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या प्रश्नांना
उत्तरे देण्याचे धाडस नाही; सभा पळपुटी
शौमिका महाडिक; समांतर सभेत सर्व ठराव नामंजूर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : गोकुळच्या आजच्या सभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांना झालेले नाही. संचालिका म्हणून नव्हे, तर सभासद म्हणूनही आम्हाला बोलण्यासाठी माईकही दिला नाही. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? आयत्यावेळेचे काही प्रश्न आहेत का? हेही त्यांना विचारावे वाटले नाही. सभा सुरू झाल्यापासून दोन तास अध्यक्षच बोलत होते. त्यामुळे आजची वार्षिक सर्वसाधारण सभा पळपुटी सभा झाल्याचा आरोप करत गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी सर्व ठराव नामंजूर केले.
विरोधकांना बोलू दिले नाही, याचा निषेध करत सभागृहाबाहेर महाडिक यांनी समांतर सभा घेतली.
महाडिक म्हणाल्या, ‘गोकुळचे अध्यक्ष सलग दोन तास बोलत होते. त्यांना समोरच्यांना संधी द्यायची नव्हती. काही गोष्टी त्यांना रेटून पुढे न्यायच्या असतात, हे जगजाहीर आहे. सभेत आम्ही चार ठरावांना विरोध केला आहे. यामध्ये पन्नास लिटर दूध संकलनाची अट शिथिल करू नका. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू असलेल्या पशुखाद्याचे दर इतर संघाइतकेच जास्त कशासाठी? हे दर कमी करावेत. अशी मागणी केली आहे. गोकुळच्या सभासदांना पशुखाद्य स्वस्त द्यावे. गोकुळचे दूध संकलन घटले आहे. बाहेरील जिल्ह्यातून दूध संकलन कशासाठी करता? हजार लिटर दूध घालणाऱ्या सभासदांच्या मताला काहीही किंमत राहणार नाही. पाच ते दहा लिटर दूध घालणारे सभासदच मालक होणार आहेत. जिल्ह्यातील सभासद नसतील, तर संघ मोडकळीस येणार नाही, हे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले आहे. दूध उत्पादकांच्याऐवजी त्यांना कॉलेज काढण्यात रस आहे. दूध, दुग्धजन्य पदार्थ, पशुखाद्याची विक्रीच कमी होत आहे. तुम्ही दुसऱ्या व्यवसायात पाय कशासाठी ठेवता. महाविद्यालय कोणाच्या हितासाठी सुरू करायला लागला आहात. महाविद्यालयाला पूर्ण विरोध आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गोकुळने शिष्यवृत्ती द्यावी. गोकुळने आपला व्यवसाय इतरत्र वळवू नये, हीच आमची मागणी होती. येवढेही बोलायला आम्हाला दिले नाही. वासाच्या दुधाचे काय झाले, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. वासाचे दूध परत देणार म्हणून त्यांचे नेते सांगत होते; पण ते किती दूध परत केले हे जाहीर करावे. यापूर्वी तेच नेते जगजाहीरपणे सांगत होते, की वासाचे दूध आम्ही परत करू; पण ते आता यावर काहीही बोलत नाहीत. वास्तविक गोकुळबाबत त्या नेत्याचा अभ्यासच कमी आहे. वास्तविक त्या आमदारांनी, त्या नेत्याला आम्ही विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरे द्यावीत, एवढीच आमची मागणी आहे.
जोतिराम घोडके म्हणाले, ‘पशुखाद्याचे दर कमी करा. गाय दुधाचे दर वाढवा. सांगली आणि कराडचे दूध घेणे बंद करावे. जिल्ह्यातील दूध घेतले पाहिजे.’
संग्राम कुपेकर म्हणाले, ‘सभासदांच्या प्रश्नांना तिलांजली दिली आहे. याचा निषेध करत आहे. सभेला येत असताना मोठ्या प्रमाणात पोलिसांनी सभासदांना आत येऊ दिले नाही. सभासद सभेला येऊच नयेत, असा बंदोबस्त केला होता. आजच्या सभेला शौमिका महाडिक संचालिका म्हणून उपस्थित होत्या. त्यांना सत्ताधाऱ्यांनी व्यासपीठावरही बोलवले नाही.’ यावेळी राजधर्वन नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.
बनावट सभासद रद्द करा : महाडिक
‘गोकुळ’मध्ये पाच ते दहा लिटर दूध घालणाऱ्या आणि नव्याने घुसडलेले बनावट सभासदांचे सभासदत्व रद्द केले पाहिजे. जे सभासद जास्त दूध संकलन करतात, अशांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. हीच आमची यामागची भूमिका असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.