ड्रोनसह ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मिरवणुकीवर वॉच
रेकॉर्डिंगही करण्यात येणार ः १५० अधिकारी, ७६३ पोलिस, ५६९ होमगार्डचा खडा पहारा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त नेमला आहे. दोन ड्रोन कॅमेरे व ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण विसर्जनावर वॉच असेल. महाद्वार रोडवरील कसबा गेट पोलिस चौकीत नियंत्रण कक्ष बनविला आहे. १५० अधिकारी, ७६३ पोलिस अंमलदार, ५६९ होमगार्डसह जलद कृती दल, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात असतील.
शहर पोलिस उपाधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी रविवारी तीनवेळा विसर्जन मार्गाची पाहणी करून सूचना केल्या. मार्गावर सहा ठिकाणी वॉच टॉवर उभारले असून, येथे स्पिकर, माईकद्वारे सूचना देण्यासाठीची व्यवस्था केली आहे.
टेंबे रोड, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौक, ताराबाई रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा मार्गावर १७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत; तर सेफ सिटीअंतर्गत असलेल्या २७ कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. कसबा गेट पोलिस चौकीमध्ये सीसीटीव्हीचा नियंत्रण कक्ष असून, येथे अधिकाऱ्यांची नेमणूक असणार आहे.
काही अनुचित प्रकार घडल्यास सीसीटीव्हीद्वारे तिथे तातडीची मदत दिली जाणार आहेच. याशिवाय संपूर्ण मिरवणुकीचे व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी ४ वॉच टॉवरवर कॅमेरे बसविले आहेत. मिरवणूक संपेपर्यंत म्हणजे सुमारे २५ ते २७ तासांचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे उपलब्ध होणार आहे.
मिक्सिंग पॉईंटवर विशेष पथके
मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, ताराबाई रोड या महत्त्वाच्या चौकांमध्ये वेगवेगळ्या पेठेतील, भागातील मंडळे समोरासमोर येऊन वादाचे प्रसंग घडतात. मिरवणुकीत असे प्रकार टाळण्यासाठी एक अधिकारी व दहा पोलिसांचे विशेष पथक अशा मिक्सिंग पॉईंटवर नेमले आहेत. अचानक गर्दी वाढल्यास मिरवणुकीतून बाहेर पडण्यासाठी सहा आपत्कालीन मार्गांचीही व्यवस्था केल्याचे पोलिस निरीक्षक झाडे यांनी सांगितले.
बंदोबस्त असा
अपर पोलिस अधीक्षक ः १
पोलिस उपअधीक्षक ः ७
पोलिस निरीक्षक ः २६
उपनिरीक्षक ः १०३
पोलिस अंमलदार ः ७६३
होमगार्ड ः ५६९
जलदकृती दल पथके ः ८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.