फोटो16033, 16034
तीन ट्रक फुला-फळांनी सजले अंबाबाई मंदिर
उत्सवाच्या मांगल्यात भर : सेल्फी पॉईंटने घातली भाविकांना भुरळ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : तब्बल तीन ट्रक भरलेल्या फुला-फळांनी अंबाबाई मंदिराचे सौंदर्य यंदाच्या नवरात्रोत्सवात आणखी खुलले. गरुड मंडपाच्या दोन्ही बाजूला पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडूच्या फुलांतून साकारलेल्या ‘श्री अंबाबाई प्रसन्न’ या अक्षरांनी उत्सवातील मांगल्यात भर घातली. फुलांच्या सजावटीतून साकारलेल्या सेल्फी पॉईंटने अनेक भाविकांना भुरळ घातली. मंदिराच्या अंतर्गत भागात केलेली फुला व फळांची केलेली सजावट व घंटा चौकात फुलांची साकारलेली रांगोळी अशा फुला-फळांच्या सजावटीने अंबाबाई मंदिर सजले.
चार वर्षांपासून नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची सजावट गोशिमाचे माजी अध्यक्ष सुभाष हिडदुगी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या परिवाराकडून विनामूल्य केली जाते. कै. हिडदुगी यांची अंबाबाई देवीवरील असणारी श्रद्धा कायम राहावी, यासाठी फुला-फळांनी मंदिर सजवले जाते. यंदाही तब्बल तीन ट्रक भरलेल्या फुला-फळांनी मंदिर सजले. याची तयारी तीन दिवस पूर्वीपासून सुरू होती. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला भाविकांच्या गर्दीतही सजावटीचे काम सुरू होते. मंदिराच्या छोट्या मंदिरांतील प्रवेशसाठी नर्सरीत वाढवलेली व जास्त काळ टिकणाऱ्या परदेशी फुलांपासून तोरणे करण्यात आली. मंदिरातील खांबांना शहाळ्याचे नारळ, सफरचंद, कच्ची केळी, डाळिंब, सफरचंद व अननस अशा फळांच्या घडांनी सजविले. तसेच जर्बेरा, कर्निशन, गुलाब, शेवंती, कमळ या विशेष करून नर्सरीमध्ये वाढविलेल्या फुलांपासून मंदिराच्या बाहेरील व आतील बाजूची सजावट करण्यात आली. ही सजावट जास्त काळ टिकावी, यासाठी ती कोल्ड स्टोरेजमधून मागविली गेली. सर्व फुले ६ टन तर फळे सुमारे १ टन अशा एकूण ७ टन फुला-फळांची सजावट ५० जणांनी पूर्ण केली. बुधवारी दिवसभर व गुरुवारी पहाटेपर्यंत मंदिराची सजावट सुरू होती. मंदिराची केलेली सजावट पाहून नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी आलेल्या भाविकांनी कॅमेऱ्यामध्ये सजावटीचे छायाचित्र बंदिस्त केले. तर सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पॉईंटवर महिलांची गर्दी होती.
-----
कोट
श्री अंबाबाई देवीवर आमच्या परिवाराची श्रद्धा आहे. या सजावटीच्या माध्यमातून देवीची सेवा घडते. हे करण्याचे बळ आम्हाला देवीच देते. त्यामुळे भाविकांच्या तोंडून सजावटीचे कौतुक ऐकून समाधान वाटते.
- सुरेखा हिडदुगी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.