निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...
.....
17895
महावीर मसुटे
क्रीडा विभाग मूग गिळून गप्प का?
‘खेळ कोल्हापुरात अन् प्रशिक्षण केंद्र पुण्यात’ या क्रीडा विभागाच्या गलथान कारभाराविरोधात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर पाठपुरावा करण्यासाठी सुरू केलेल्या ‘निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या’ या सदराखाली कोल्हापुरात केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी आम्हा आजी-माजी फुटबॉलपटूंच्या दररोज प्रतिक्रिया प्रसिद्ध होत आहेत. दोनवेळा विविध क्रीडा संघटनांनी आंदोलनही केले. तरीसुद्धा क्रीडा विभाग अजूनही मूग गिळून गप्प का आहे? याबद्दल काहीच कार्यवाही का झालेली नाही? विभागाने याबाबतचा प्रस्ताव तरी दिला आहे की, नाही याबाबत कल्पना नाही. येत्या काळात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होईल. पुन्हा हा प्रश्न आचारसंहितेत अडकून पडू नये, यासाठी लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवावा आणि सरकारकडून केंद्र पूर्ववत सुरू करून घ्यावे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूरचे फुटबॉल क्षेत्र काय करू शकते, याची चुणूक लोकसभा निवडणुकीत सर्वांनी अनुभवली आहे. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, अशा आणीबाणीच्या परिस्थितीत क्रीडा विभागाने पुन्हा हे केंद्र सुरू करीत आहोत, अशी घोषणा करणे हितवाह ठरेल. क्रीडा प्रबोधिनीचा झेंडा अटकेपार ठेवण्यासाठी कोल्हापुरातील नवोदित फुटबॉल टॅलेंट सज्ज आहे. त्यासाठी या प्रबोधिनीच्या प्रशिक्षकांची गरज या क्षेत्राला अधिक आहे. पायाभूत सुविधांसह अद्ययावत प्रशिक्षणासाठी सुसज्ज अशा केंद्राची गरज आहे. राज्य शासन इतर प्रश्नांची सोडवणूक अग्रक्रमाने करीत आहे. पण हा प्रश्न मागे का ठेवला आहे, याबद्दल आता तमाम फुटबॉलप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे. प्रबोधिनीत तयार झालेले खेळाडू ऑलिंपिकपर्यंत पोहोचतात. त्यामुळे ही प्रबोधिनी आणि संबंधित खेळाचे केंद्र किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या विभागाला होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. तरच कोल्हापूरच्या क्रीडा विश्वाचा विकास होईल.
- महावीर मसुटे, ज्येष्ठ फुटबॉलपटू
..............
17897
प्रतीक साळोखे
शासनाने मागणीचा सकारात्मक विचार करावा
गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ ‘सकाळ’मधून कोल्हापुरात क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत निवासी फुटबॉल केंद्र सुरू करण्याबाबत फुटबॉल क्षेत्रासह सर्वसामान्यांमधून मागणी होत आहे. आम्हा कोल्हापूरकरांना आंदोलनाशिवाय काहीच मिळत नाही. मग तो प्रश्न सामाजिक, आरोग्य विषयक, मूलभूत सुविधा असोत. आता त्यात क्रीडा क्षेत्राचाही समावेश झाला आहे. शासनाने रास्त मागणी असतानाही याबाबत काहीच भूमिका जाहीर केलेली नाही. कोल्हापूरचे फुटबॉल प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे खेळासाठी वाट्टेल ते करणारी मंडळी याच नगरीत आहेत. हे केंद्र केवळ कोल्हापूरसाठी करा, असे आम्ही म्हणत नाही. याचा फायदा कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नवोदित खेळाडूंना होईल. हेच टॅलेंट राज्याला आणि देशाला सातासमुद्रापार नेईल. ऑलिंपिकपर्यंत पोहोचणारी मुले, मुली याच क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू होते. दर्जेदार प्रशिक्षण मिळाले की, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील. याशिवाय चांगले प्रशिक्षकही याच केंद्रातून तयार होतील. सर्वाधिक फुटबॉल चाहते आणि संघ याच नगरीत आहेत. याचा विचार करून शासनाने जिथे जे चालते ते द्यावे. क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत केवळ फुटबॉलच नव्हे तर सर्वच खेळांची प्रशिक्षण केंद्रे येथे सुरू करावीत. त्यामुळे कोल्हापूर केवळ कुस्तीसाठी नव्हे तर फुटबॉलचे हब म्हणून देशात ओळखले जाईल.
- प्रतीक साळोखे, ज्येष्ठ फुटबॉलपटू
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.