17970
कोल्हापूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने दसरा चौकातील जाहीर समारंभात केले. शेजारी (डावीकडून) धैर्यशील माने, राजेश क्षीरसागर, धनंजय महाडिक, संजय मंडलिक, अमल महाडिक, सुजित चव्हाण. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)
हरियानाची पुनरावृत्ती
महाराष्ट्रात करा ः शिंदे
महापालिकेचे रोजंदारी कर्मचारी कायम केल्याची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः महायुतीचे सरकार आपलं आहे. ते, शेतकऱ्यांचे आणि गोरगरिबांचे सरकार आहे. आता महाराष्ट्रात सुद्धा निवडणुका होणार आहेत. येथे हरियानाची पुनरावृत्ती करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. आजपर्यंत एवढ्या कमी वेळात एवढे निर्णय कोणत्याच सरकारने घेतले नाहीत. त्याचेही दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, असे आव्हानही त्यांनी यावेळी विरोधकांना दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन दसरा चौकातील समारंभातून केले. यावेळी त्यांनी महापालिका रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केल्याचेही जाहीर केले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळण करीत आतषबाजी केली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक आयुक्त के. मंजुलक्ष्मी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळेच आम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. त्याला सावत्रभावांनी, दुष्टप्रवृत्तींनी विरोध केला; मात्र न्यायालयाने सुद्धा त्यांना धुडकावून लावले. आता दुसरा तिसराच नव्हे, तर आचारसंहितेमुळे ऑक्टोबर- नोव्हेंबरचेही आगाऊ पैसे जमा करण्याचे काम मी आजच केले आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्यांना आता लाडकी बहीण म्हटले की छातीत धडकी भरते. योजनेला विरोध करणाऱ्या दुष्ट भावांवर तुमची नजर पाहिजे.’’
ते म्हणाले, ‘‘महायुतीत २४ तास काम करणारे दोन उपमुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत. विकासकामांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आता महाराष्ट्रात हरियानाची पुनरावृत्ती होऊ दे. हे सरकार जे करणार आहे तेच बोलणारे आहे. जे करणार नाही ते बोलणार नाही. तुमच्याशी मला पुन्हा संवाद साधायचा आहे. तुमच्यासमोर यायचे आहे. त्यामुळे हे फसवे सरकार नाही. योजना जाहीर करून नंतर ‘प्रिंटिंग मिस्टेक’ म्हणणारे सरकार नाही, किंवा आता पैसे नाहीत म्हणणारे सरकार नाही.’’
विविध योजनांचा आढावा घेताना शिंदे म्हणाले, ‘‘कार्यकर्ता घरात बसून चांगला दिसत नाही, तो लोकांच्या दारात चांगला दिसतो. त्यामुळे आम्ही शासन आपल्या दारी योजना आणली. यातून पाच कोटी पंधरा लाख लोकांची कामे झाली. आम्ही लोकांच्या दारात जातो, शेतकऱ्यांच्या बांधावर जातो. फेसबुकवरून सरकार चालवत नाही. आम्ही ‘फेस टू फेस’ जातो. आम्ही लाडका भाऊ योजना आणली. ज्येष्ठांना एसटी प्रवास मोफत केला. महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली. ही योजना जाहीर करताना एस. टी.चे अधिकारी एसटी पुन्हा तोट्यात जाणार, असे सांगत होते. तेव्हा मी खड्ड्यात गेलो तरी चालेल असे म्हणालो होतो. आता या योजनांमुळे एसटी फायद्यात आली आहे. लाडक्या दीदीचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शिक्षणाचे शुल्क माफ केले. एका मुलीने शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नाही म्हणून आत्महत्या केली. तेव्हा ही बाब सरकारसाठी लाजीरवाणी आहे असे वाटले आणि मुलींना उच्च शिक्षण सुद्धा मोफत केले. लाडकी बहीण योजनेसाठी येत्या आर्थिक वर्षापर्यंत ४८ हजार कोटींच्या निधीची व्यवस्था केली आहे. कोल्हापुरातूनच पहिली ज्येष्ठांना मोफत तीर्थदर्शन घडविणारी रेल्वे अयोध्याला गेली. बचत गटांनाही असलेल्या निधीत दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे हे सरकार हप्ते घेणारे नाही, तर हप्ते देणारे आहे. ही देना बॅंक आहे, घेणारी बँक नाही. तुम्ही हे सगळे समजून घ्या. यापूर्वी कोणत्याही सरकारने एवढ्या वेळेत एवढे निर्णय घेतले नाहीत. त्याचे कधीही दूध का दूध और पाणी का पाणी होऊ दे.’’
श्री. क्षीरसागर यांनीही त्यांच्या भाषणाची सुरुवात करताना एका मुख्यमंत्री लाडक्या बहिणीने त्यांच्याकडे व्यक्त केलेली भावना काय आहे, हे मोबाईलवरील रेकॉर्डिंग सर्वांना ऐकून दाखविले. कोल्हापुरातील विकास गंगा केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या भरीव निधीमुळे असल्याचेही ते म्हणाले. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरवरील प्रेम त्यांनी निधी देऊन दाखवून दिले.’’ याचवेळी महापालिका रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांना करवीरनिवासिनी अंबाबाईची प्रतिमा येथे भेट देण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सायंकाळी सहा ते नऊपर्यंत महिलांसह अनेकजण पावसातही थांबून होते. यावेळी नीलेश हंकारे, गजानन मोरे, शिवाजी जाधव, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.
कोल्हापूरचे लोक जीवाला जीव देणारे
कोल्हापुरातील लोक जीवाला जीव देणारे आहेत. मी २०१९ च्या महापुरात स्वतः पाहिले; तेव्हा मी मंत्री होतो. येथे मी स्वतः मदतीला धावून गेलो होतो. एनडीआरएफची तुकडी आली; पण येथे एकमेकांना मदत करणारे अनेक हात होते. गुरांना सुद्धा आपल्यासोबत ठेवणारी ही कोल्हापूरची जनता आहे. येथील लोक जीवाला जीव देणारे आहेत, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे, असाही उल्लेख मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणात केला.
ही माणसं आपली की
फटाक्यांची आताषबाजी सुरू असल्यामुळे भाषण सुरू करता येत नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यासपीठावरून आतषबाजी थांबविण्याची विनंती केली. तरीही ती सुरूच राहिली. यावर त्यांनी ‘राजेश’ ही फटाकेवाली माणसं आपली आहेत की विरोधकांची आहेत, असा मिश्कील सवाल केला आणि म्हणाले, ‘मला बोलूच देत नाहीत.’ यावर एकच हश्शा पिकला.
---------------------
प्रस्ताव मंजूर केला..आणि गुलालाची उधळण
महापालिकेच्या ५०७ रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न १९८५ पासून प्रलंबित होता. त्याबाबत राजेश क्षीरसागर यांनी भाषणात सांगितले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण सुरू करताच महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना व्यासपीठावर बोलावून घेतले. रोजंदारीच्या प्रश्नावर हा प्रस्ताव तुमच्याकडे आहे, असे सांगितले. यावर तो मी मंजूर केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यांच्या ऑर्डर आचारसंहितेपूर्वी द्या, अशाही सूचना केल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी तेथेच गुलालाची उधळण केली. आतषबाजी सुरू केली. यामुळे सहा कोटी ५० लाखांचा बोजा महापालिकेवर पडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.