डांगडूंग
खुर्ची फोटो
-
चंदगडच्या गडावरून…
--
चंदगड तालुका जिल्ह्याचं शेवट टोक. तालुका कागदोपत्री दुर्गम मानला जात असला तरी इथले राजकारणी मात्र ‘गेमचेंजर’ मानले जातात. राजकीयदृष्ट्या इथे हुकमी एक्के असतात. यंदाच्या विधानसभेला चंदगडावर आमदार होणाऱ्यांची भलतीच गर्दी झाली आहे.
--
माननीय दादा (टोपीवाले) ः हे दादा, म्हणजे इथले विद्यमान कारभारी, मु. पो. म्हाळवाडी (ता. चंदगड) पण राहणार बेळगाव. दादांना घरातच वडिलांकडून राजकीय वारसा मिळालेला. यंदा दादा दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. घड्याळ तेच, काटे तेच मात्र टिकटिक मात्र वेगळी आहे. दादा, घड्याळ घेऊन दुसऱ्यांदा रिंगणात उभे आहेत; पण घड्याळाची वेळ बदलली आहे.
--
डॉक्टर ताई ः आमच्या डॉक्टर यंदा चंदगडच्या रिंगणात. ताईंना राजकारणाचा मोठा वारसा. ताईंच्या मागे बाबांच्या राजकारणाची मोठी शिदोरी. ताई मु.पो.- कानडेवाडी (ता. चंदगड), ते रूईकर कालनी, व्हाया नागपूर. ताई व्यवसायाने डॉक्टर आहेत. मतदारसंघाचं बिघडलेलं ‘राजकीय आरोग्य’ दुरूस्त करण्यासाठी ताई ‘तुतारी’ फुंकत सज्ज झाल्या आहेत.
--
आमचे भाऊ ः आमचे एक भाऊ मु.पो. इमान सावर्डेचे (चंदगड). ‘इनामदार’ म्हणायचे. व्हाया मु.पो. ठाणे, भाऊ म्हणजे माथाडींचे तारणहार. भाऊ दुसऱ्यांदा चंदगडाच्या गडावर आपले अपक्ष म्हणून रिंगणात नशीब आजमावत आहेत. आम्ही भाऊंना, कधी कधी भाईंही म्हणतो. भाऊंचं चिन्ह पाण्याची टाकी. मतांच्या टाकीनं आपली पाण्याची टाकी भरण्यासाठी भाऊ पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पालथा घालत आहेत.
--
आमचे आणखी एक मित्र अप्पी दादा ः मु. पो. महागाव (ता. गडहिंग्लज) तर आप्पीदादा अपक्ष म्हणून दुसऱ्यांदा चंदगडच्या मैदानात शड्डू मारत उतरले आहेत. अप्पींना तालुका पंचायत, ‘केडीसीसी’, साखर कारखान्याचा कारभाराचा दांडगा अनुभव. अप्पींदादा बादली घेऊनच रिंगणात ‘मतांनी आपली बादली भरा’ असं आवाहन करत आहेत.
---
आमचे साखरेसारखे गोड मित्र ‘मानसिंग दादा’ ः मु. पो. हालेवाडीचे (ता. आजरा). चंदगड व्हाया कोल्हापूरचे, ‘मानसिंगदादा’ म्हणजे ‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’ असचं व्यक्तिमत्त्व. ‘दादा’ साखर उद्योगातले. एका सर्वसामान्य गिरणी कामगारांचे चिरंजीव. मात्र, स्वकर्तृत्वावर मोठे झालेले.
कारखानदारीतले जाणकार. चंदगडचा ‘दौलत’ चालवायला घेतल्यापास्न दादांना ‘चंदगडची राजकीय दौलत’ आपल्या ताब्यात असावी, असं वाटू वागलं आहे. (वाटायलाच हवं, सर्वसामान्यांच्या मुलांन आमदार व्हायचं नाही का?). मतदारसंघात ‘सुराज्य’ आणायचचं या इराद्यानं वारणंच्या सावकरांच्या साथीनं नारळाच झाड घेऊन चंदगडच्या गडावर ‘मानसिंगदादा’ साखर पेरणी करत आहेत.
-----
चंदगडाच्या गडावर रिंगणात ‘सतरा’ आणि कोणाला ‘खतरा’ हे इथले मतदारच ठरवतील.
असो- चंदगडाच्या गडावर चार चर्चेतले चेहरे आहेत. तरीबी.
- दादांचं बदललेलं ‘घड्याळ’ किती ‘गजर’ करणार?,
- ताईंच्या ‘तुतारी’चा आवाज चंदगडात किती ‘घुमणार’?
- भाऊंची ‘पाण्याची टाकी मतांनी किती भरणार.?
- अप्पींची बादली मतांनी किती भरणार?
-‘मानसिंगदादांचं’ नारळाच्या झाडाला मतांचं किती नारळ लागणारं ?
हे येत्या २३ तारखेलाच कळणार..
- तोपर्यंत सर्वांनाच शुभेच्या आणि.. ALL THE BEST...
------------------
तुमचाच जीवाभावाचा मैतर..
-सबना मास्तर..
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.