कोल्हापूरला हुडहुडी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : शहरासह जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. आज तर अंगात हुडहुडी भरणाऱ्या थंडीने कोल्हापूरकर गारठले. दिवसभरात पारा कमाल २८ व किमान १३ अंश सेल्सियस दरम्यान राहिला. वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी दिवसाही उबदार कपडे परिधान केलेले पाहायला मिळाले.
गेल्या चार दिवसांपासून थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. आज तर उन्हातही अंगात हुडहुडी भरणारी थंडी जाणवली. कोल्हापूरकरांनी यापूर्वी न अनुभवलेली थंडी यावेळी अनुभवायला मिळत आहे. अंगात कळा मारणाऱ्या थंडीने कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. यापूर्वीच्या तापमानापेक्षा यंदा कमी तापमान जाणवत असून, यामुळे थंडीच्या झळा अंगाला अक्षरश: बोचत आहेत. या थंडीमुळे शहरासह ग्रामीण भागात शेकोट्यांची धग वाढत आहे. उत्तरेकडील राज्यांमधील तापमानात घट होत आहे. परिणामी, तिकडून येणाऱ्या शीत लहरींचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होत आहे. त्यामुळे येथील तापमानातही कमी अधिक प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे पारा कमी होऊन अंग गोठविणारी थंडी वाढत आहे, असा अंदाज हवामान व पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्गात पारा ११ अंशावर
वैभववाडी : जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले असून, आज पहाटे मुळदे संशोधन केंद्रावर ११ अंश सेल्सियस इतक्या या वर्षातील नीचांकी तपमानाची नोंद झाली. हवामान विभागाने ३ आणि ४ डिसेंबरला पावसाचा अंदाज दिल्यामुळे आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे. सध्या आंबा, काजू पिकाला सध्या चांगली पालवी आणि मोहोर येऊ लागला आहे. ढगाळ वातावरण आणि पाऊस झाल्यास या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नीचांकी तापमान १०.५ अंश सेल्सियसची नोंद झाली होती.
दापोलीत नीचांकी
दापोली (ता. रत्नागिरी) : कोकणात शहरासह ग्रामीण भागात दिवसागणिक थंडीचा कडाका वाढू लागला आहे. दापोली तालुक्यात गारठा अधिकच वाढला असून, यावर्षी तापमान आणखीन खाली आले आहे. यावर्षीच्या निचांकी तापमानाची नोंद (९ अंश) दापोलीत झाली आहे; तर रत्नागिरीत पारा १८ अंशांवर आणि चिपळुणातही किमान तापमान पहिल्यांदाच १५.५ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.