लोगो
बिग स्टोरी
-अमोल सावंत
जनावरांकडे द्या लक्ष,
विषबाधेकडे नको दुर्लक्ष
संतुलित, सकस आहार दिला तरच चांगले दुग्धोत्पादन
ीजनावरांमध्ये विषबाधा अनेक कारणांनी होते. वनस्पतीजन्य आणि बुरशीजन्य विषबाधेमुळे जनावरांच्या आरोग्यावर, दुग्धोत्पादनांवर परिणाम होतो. विषबाधेचे प्रमाण जास्त असेल तर जनावरे मृत होतात. यासाठी जनावरांना ओला/सुका चारा, पशुखाद्य देताना काळजी घ्यावी. जनावरांना संतुलित, सकस आहार दिला तरच चांगले दुग्धोत्पादन मिळेल. यासाठी परिसरातील विषारी वनस्पती आणि मुरघास, पेंडेतून बुरशीजन्य विकार कसे तयार होतात, याची माहिती घ्यावी. जेणेकरून जनावरांमध्ये विषबाधा होणार नाही.
वनस्पतीजन्य विषबाधा
पिवळा धोत्रा, रुई, गाजर गवत, एरंडाची बी, पिवळी कन्हरे किंवा अन्य तणवर्गीय वनस्पतीतील पाने, फुले, फळे, कंद, मूळ जरी जनावरांच्या शरीरात खाद्यातून गेले तर वनस्पतीजन्य विषबाधा होते. गवताची कुरणे, माळराने, पडीक जमिनी, शेती क्षेत्र अशा ठिकाणी चाऱ्यांबरोबरच तणवर्गीय वनस्पतीही उगवलेल्या असतात. याकरीता विषबाधा होणाऱ्या वनस्पती कुठल्या याची माहिती शेतकऱ्याने घ्यावी. डॉ. मधुकर बाचुळकर म्हणाले, ‘३५ ते ४० वर्षांपूर्वी इस्लामपूर भागात ‘पास्कालिया गावका’ नावाचे तण उगवले होते. हे तण अन्य चाऱ्यांच्या माध्यमातून जनावरांच्या पोटात गेले आणि अनेक जनावरे दगावली होती. जेव्हा या तणाचा शोध घेतला तेव्हा ते परदेशातून भारतात आल्याचे सिद्ध झाले होते.’ अशाच पद्धतीने पेठवडगाव येथे रॅगवीड या तणाचा परदेशातून शिरकाव झाला असून, ते मानवांबरोबर जनावरांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे.
वनस्पतीतील विषबाधेमुळे काय होते?
- पोट फुगणे
- लंगडेपणा
- वेदना
- पचनक्रिया बिघडणे
- जळजळ होणे
- वजन कमी होणे
- यकृत, मूत्रपिंडाचे नुकसान
- ग्लुकोज पातळी कमी होणे
- रक्त गोठण्यास अडथळा निर्माण होणे
- त्वचा आणि डोळ्यांवर परिणाम
- डोळ्यांत पाणी येणे
- पोटशूळ, तोंडात फेस येणे
रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
अफ्लाटॉक्सिन म्हणजे काय?
डॉ. प्रकाश दळवी म्हणाले, ‘चाऱ्यांमधील बुरशीजन्य अंश जनावरांमध्ये गेल्यास विषबाधा होऊ शकते. या बुरशीतील अफ्लाटॉक्सिन हा घटक घातक ठरतो. यासाठी ‘गोकुळ’ दूध संघातर्फे दुधाची प्रत चांगली व्हावी, यासाठी शेतकऱ्यांना अफ्लाटॉक्सिन बुरशीवर प्रबोधन करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.’ पशुखाद्य आणि चाऱ्यामधील अॅस्परजीलस प्रजातीमुळे ही बुरशी वाढते. यातून अफ्लाटॉक्सिन विष तयार होते. हे विष खाद्याच्या माध्यमातून जनावराच्या शरीरात जाते. यानंतर ते दुधात येते. असे विषयुक्त दूध मानवी आरोग्यास धोकादायक असते.
अफ्लाटॉक्सिन तयार होण्याची कारणे
- मुरघास तयार झाल्यानंतर जनावरांना खायला दिल्यानंतर बॅग चांगली बंद न केल्यास
- मुरघास तयार करताना बुरशी लागलेली चारा पिके वापरल्यास
- मुरघास तयार करणाऱ्या पिशवीत पाणी किंवा हवा गेल्यास
- पिशवीत मुरघास तयार केल्यानंतर पाच दिवसांत पिशवीतील हवा बाहेर न काढल्यास
- वाळलेला चारा पावसात भिजल्यास
- पशुखाद्य किंवा पेंडेचा पाण्याशी संपर्क झाल्यास
- पशुखाद्य आणि पेंड अति दमट ठिकाणी अधिक काळ केल्यास
अफ्लाटॉक्सिनचा परिणाम
*रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर सतत आजारी पडते
*दुधातील फॅट, सॉलिड नॉट फॅट प्रमाण कमी होते
*कासेला सूज, यकृतास इजा, खुरांचे विकार
*चाऱ्याच्या कुबट वासामुळे जनावर चारा कमी खाते
*जठर आणि आतड्याला इजा होऊन रक्तस्त्राव
*जनावरे कमी चारा खातात. वासरांची वाढ खुंटते
*गर्भाची पूर्ण वाढ न झाल्यामुळे गर्भपात
*जनावरांमध्ये माजाच्या तक्रारी
*जनावरांना हगवण लागल्याने ते अशक्त होते
*मूत्रपिंडावर दुष्परिणाम
...
कोट
जनावरांमध्ये जशी वनस्पतीजन्य विषबाधा होते तशीच कोवळी ज्वारी, ज्वारीचे खूट खाणे, अमोनियम नायट्रेट पॉयझनिंग, स्ट्रिकनिंग पॉयझनिंग, किटकनाशके, ऑईल पेंट, टाकाऊ बॅटरीच्या सेलमधील पदार्थ, शिसे, सर्पदंश (घोणस), घाणेरडे पाणी प्यायल्यानंतर असे विष प्रवेश करते. त्यामुळे जनावरे मृत होतात. चराईच्या ठिकाणी असे पदार्थ येणार नाहीत, याची काळजी पशुपालकांनी घ्यावी.
-डॉ. शाम लुद्रिक, सहायक आयुक्त, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय.
कोट
जिल्ह्यात तणवर्गीय वनस्पतींचा यात शिरकाव झालेला आहे. यातील ९९ टक्के तणे परदेशातून आलेली आहेत. बहुतांश तणे ही विषारी असून, जनावरांच्या चाऱ्यांमध्ये चुकून गेली तर विषबाधा होऊ शकते; मात्र मुद्दामहून विषारी वनस्पती किंवा तणेही जनावरे खात नाहीत. कारण कोणती वनस्पती खावी, याचा एक ‘सेन्स’ जनावरांत असतो.
-डॉ. मधुकर बाचुळकर, वनस्पती संशोधक.
कोट
जिल्ह्यातील ९९ टक्के शेतकरी जनावरे गोठ्यात बांधतात. त्यामुळे जनावरे बाहेर काढून कुरण, जंगलांमध्ये चरण्याचे प्रमाण नगण्य आहे. चरताना चुकून विषारी वनस्पतींचा अंश जनावरांच्या शरीरात जाण्याची शक्यता कमी असते. तरीही असे विष शरीरात गेले तर पशुवैद्यकांकडून उपचार करून घ्यावेत. जनावरांना चारा, पशुखाद्य देताना काळजी घ्यावी.
-डॉ. प्रकाश दळवी, सहायक व्यवस्थापक, पशुसंवर्धन व प्रशिक्षण विभाग, गोकुळ संघ.
...
चार्ट तक्ता
जिल्ह्यातील पशुधन (२०११ च्या पशुधन जनगणनेनुसार)
गायी : २,८३, ६३७
म्हैशी : ५,६८, ८८४
शेळ्या : १,३०,०५३
मेंढ्या : ९६,१७६.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.