विशाळगड पर्यटक, भाविकांसाठी खुला
प्रशासनाकडून अटी-शर्ती लागू, संचारबंदी शिथिल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः विशाळगड आणि मुसलमानवाडी येथे झालेल्या तोडफोडीनंतर तेथे तब्बल सहा महिने संचारबंदी लागू होती. मात्र, आजपासून ही संचारबंदी शिथिल करण्यात आली. अटी आणि नियम लागू करून पर्यटक आणि भाविकांना विशाळगडावर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे दिली.
विशाळगडावरील अतिक्रमण काढावे, यासाठी १४ जुलै २०२४ ला आंदोलन झाले. यावेळी विशाळगड आणि पायथ्याला असणारी मुसलमानवाडी येथे दगडफेक आणि तोडफोड झाली. त्यानंतर गडावर संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे सहा महिन्यांपासून येथे पर्यटक आणि भाविकांना परवानगी नव्हती. पर्यटन हाच येथील मुख्य व्यवसाय आहे. संचारबंदीमुळे येथील नागरिकांच्या रोजगाराचाच प्रश्न निर्माण झाला. आता येथील तणावपूर्ण वातावरणही निवळले आहे. त्यामुळे विशाळगडावरील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. काही अटी आणि नियम लागू करून पर्यटकांना विशाळगडावर जाता येईल. तसेच येथील सर्व जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठीही प्रशासनाने सर्व उपाययोजना केल्या आहेत, असे येडगे यांनी स्पष्ट केले.
या आहेत अटी
- सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेतच विशाळगडावर सोडण्यात येईल
- गडावरील स्थानिकांशिवाय कोणालाही येथे मुक्काम करता येणार नाही
- गडावर मद्य आणि मांस घेऊन जाता येणार नाही
- पर्यटकांची तपासणी करूनच पुढे जाऊ दिले जाईल
- पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही संघटनांना विशाळगड आणि परिसरात कोणताही उपक्रम घेता येणार नाही
पोलिसांच्या परवानगीनेच उरूस
या महिन्यात विशाळगडावरील उरूस असतो. यावेळी पोलिस प्रशासनाकडून त्या काळातील परिस्थिती लक्षात घेऊनच उरूसाला परवानगी देण्यात येईल. तसेच छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाची परवानगी पोलिसांकडूनच देण्यात येईल. त्यानंतरच उत्सव साजरे होतील, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
अतिक्रमणांवरील कारवाई सुरूच
विशाळगडावर अतिक्रमणे आहेत. ती न्यायालयाच्या निर्देशानुसारच हटवली जात आहेत. काही अतिक्रमणांच्या विषयात पुरातत्त्व विभागाकडून सुनावणी घेऊन पुढील कार्यवाही होणार आहे. त्याची प्रक्रियाही सुरू आहे, असेही सांगण्यात आले.
मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू
विशाळगडावर असणाऱ्या पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पाच कोटींचा निधीही देण्यात आला आहे. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे जाणाऱ्या रस्त्याचेही काम या अंतर्गत होणार आहे.
-----------------------------
शासनाच्या निर्णयाचे स्वागत
विशाळगडावरील संचारबंदी शिथिल करून पर्यटकांना येथे जाण्यासाठी मुभा देण्याचा प्रशानाचा निर्णय चांगला असून आम्ही त्याचे स्वागत करतो. याबाबतचे निवेदन आम्ही प्रशासनाला दिले होते. शासनात्या या निर्णयामुळे येथील सामाजिक सलोखा जपला जाणार आहे. विशाळगड, आंबा परिसरात पर्यटनाला मोठा वाव आहे. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारही मिळणार आहे.
- प्रा. उदय नारकर (नेते, किसान सभा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.