कॉमन खेळाचा फोटो किंवा क्लिपार्ट वापरणे...
...................
राष्ट्रीय स्पर्धेत ‘कोल्हापूरची पोरं’च ठरली भारी
कुस्ती, रग्बी, जलतरण, खो-खो, नेमबाजीसह विविध खेळांत चमकदार कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः क्रीडानगरी म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात कोल्हापूरचा दबदबा निर्माण होत आहे. त्यात मागील महिन्यात उत्तराखंड येथे झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती, रग्बी, जलतरण, खो-खो, नेमबाजी, मैदानी आदी स्पर्धांत महाराष्ट्राच्या संघाने दुसरा क्रमांक पटकाविला. त्यात कोल्हापूरच्या खेळाडूंनी सिंहाचा वाटा उचलला होता.
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ५४ सुवर्ण, ७१ रौप्य आणि ७६ कांस्य अशी २०१ पदकांची लयलूट केली. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या २७ ने कमी भरली. तरीही महाराष्ट्र संघाने दुसरा क्रमांक मिळवला. यात कोल्हापूरच्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा होता. यात कुस्तीमध्ये नंदिनी साळुंखे, शिवानी मेटकर, अमृता पुजारी, सुशांत पालवे, रोहन रंडे, तर नेमबाजीत राही सरनोबतने ५० मीटरमध्ये सुवर्ण, तर सोनम मस्कर, शाहू माने, शांभवी क्षीरसागर यांनी चमकदार कामगिरी केली. जलतरण स्पर्धेत बेस्ट स्ट्रोक ४ बाय १०० मिडले रिलेत पृथ्वीराज डांगेने एक, तर जोती पाटीलने वैयक्तिक व सांघिक अशा दोन ब्राँझ पदकांची कमाई केली. ज्योतीचा भाऊ दीपक पाटील यानेही चौथा क्रमांक मिळवला. वॉटरपोलो स्पर्धेत पूजा भुमरे, सृष्टी भोसले यांनी सांघिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.
रग्बी स्पर्धेत संकेत पाटील, प्रणव पाटील, सोमेश पाटील, वल्लभ पाटील, तेजस पाटील, श्रीधर निगडे, मुलींमध्ये वैष्णवी पाटील, कल्याणी पाटील, पूजा कुंभार, शुभांगी गावडे, नम्रता पाटील यांनीही रौप्य आणि ब्राँझ पदकांची कमाई केली. मैदानी स्पर्धेत सत्यजित पुजारी व सिद्धांत पुजारी, रोहन कांबळे यांनी चौथा क्रमांक मिळवत चमकदार कामगिरी केली.
खो-खो स्पर्धेत इचलकरंजीच्या सौरभ आडावकर, श्रेया पाटील यांनी प्रत्येकी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. कबड्डीत महाराष्ट्राच्या पुरुष संघातही ओंकार पाटीलचा समावेश होता. त्यानेही सांघिक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. हॉकीतही इचलकरंजीच्या किरण मोहितेने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत सांघिक ब्राँझ पदकाची कमाई केली.
................
या खेळांचेही माहेर
कोल्हापूर कुस्ती, फुटबॉलसोबतच रग्बी, नेमबाजी, जलतरण, मैदानी, खो-खो खेळांचेही माहेरघर बनत आहे. या खेळांकडे मोठ्या संख्येने नवोदित खेळाडू आकर्षित होत आहेत. त्यातून राज्याला नवे खेळाडू मिळत आहेत. या खेळांतून नोकरीशिवाय सुवर्णपदक विजेत्यास सात लाख, तर रौप्यपदक विजेत्यास पाच लाख आणि ब्राँझ पदक विजेत्यास तीन लाख, तर प्रशिक्षक, व्यवस्थापकांना प्रत्येकी ३० हजार रुपये शासन प्रोत्साहन म्हणून देत आहे.
..............
कोट
राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोल्हापूरचे खेळाडू मोठी कामगिरी करीत आहेत. कुस्तीसोबत जलतरण, नेमबाजी, पारंपरिक खेळात कबड्डी, खो-खो, रग्बीमध्ये यश मिळवत आहेत. त्यासाठी क्रीडा विभागाने आता चांगल्या सुविधा पुरवाव्यात इतकीच अपेक्षा आहे.
- अजय पाठक, महाराष्ट्र राज्य जलतरण संघ व्यवस्थापक
.....
कोट...
कबड्डीसह जलतरण, नेमबाजी या खेळांकडे मोठ्या संख्येने नवोदित मुले-मुली आकर्षित होत आहेत. त्याप्रमाणे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी अपेक्षित असेल तर त्यासाठी क्रीडा विभागाने चांगल्या सुविधा द्यायला हव्यात.
- अजित पाटील, कबड्डी संघटक
.............
कोट...
कोल्हापूरची मुले-मुली सरावासाठी मैदान नसतानाही राष्ट्रीय स्पर्धांसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत आहेत. या खेळासाठी पालकमंत्री, क्रीडा विभागाने मैदानाची व्यवस्था करावी. सुविधा मिळाल्यास ही मुले आणखी चांगली कामगिरी करतील.
- दीपक पाटील, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, रग्बी
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.