जुना ढीग हटेना, नवा कचरा मावेना !
गडहिंग्लजचा कंपोष्ट डेपो ः जागेअभावी ज्या-त्या दिवशीच्या प्रक्रिया
अजित माद्याळे ः सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ ः पालिकेच्या संकेश्वर रोडवरील कंपोष्ट डेपोमध्ये साधारण १६ हजार मेट्रिक टन कचऱ्याचा ढीग अजूनही हलायला तयार नाही. त्यामुळे रोज जमा होणारा १६ ते १८ टन कचरा टाकण्यासाठी जागाच नसल्याने प्रशासनावर या कचऱ्यावर ज्या-त्या दिवशीच प्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. शहराबाहेर नवीन जागा पाहणीचा प्रयत्न होत असला तरी ''तुमचा कचरा आमच्या हद्दीत नको'', अशी भूमिका संबंधित ग्रामपंचायतींनी घेतल्याचे चित्र आहे.
सुरुवातीला संकलनातील सुक्या कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याने त्याचा ढीग साचतच गेला. मध्यंतरी या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी मशीन खरेदी केली. माती, दगड, प्लास्टिक असे साहित्य वेगळे होऊ लागले. खत म्हणून मातीची विक्री सुरू केली. परंतु, मशीनची क्षमता आणि कचऱ्याच्या साठ्यात तफावत असल्याने ढीग हललाच नाही. रोजचा कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने जुना ढीगच जेसीबीने पसरून त्यावर नवा कचरा टाकला जायचा. त्याचीही मर्यादा आता संपली आहे. उंच ढिगावर रोजचा कचरा टाकणे अशक्य ठरत आहे.
दरम्यान, पालिकेकडून नव्या जागेचा शोध सुरू झाला. शहरालगतची एक जागा निश्चित केली, परंतु संबंधित ग्रामपंचायतीने कचऱ्यासाठी जागा देण्यास नकार दिल्याचे समजते. परिणामी उपलब्ध कंपोष्ट डेपो रिकामे करण्याचा एकच पर्याय आहे. तथापि, प्रशासन आता सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंगचा ठेका देण्याच्या विचारात आहे. त्याचा प्रस्तावही तयार होत असून, त्यासाठी जुना कचरा नेमका किती शिल्लक आहे, त्याच्या मोजमापाचेही काम सुरू केले आहे. यात संबंधित ठेकेदारावर जुन्या कचऱ्याचे बायोमायनिंग करून मातीपासून खतनिर्मिती व इतर कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावून जागा रिकामी करून देण्याची जबाबदारी राहणार आहे.
--
मशीन आहे, पण...
सध्या सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे दोन मशीन आहेत. यातील एक सुरू आहे. दुसऱ्या मशीनची स्थिती काय आहे, हे पाहून नव्या डीपीआरमध्ये आणखी एक मशीन घेण्याचा विचार पालिकेचा असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात शिल्लक कचरा किती, रोज किती टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आणि किती दिवसात जागा रिकामी होणार, याचा अभ्यास सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.