35486
गडहिंग्लज ः घाळी कॉलेजमधील अभ्यासक्रमाच्या समारोप कार्यक्रमात डॉ. दत्ता पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित ए. जी. गोडघाटे, पंकज ढापळे, अभिजित इंगळे आदी.
गडहिंग्लजला अभ्यासक्रमाचा समारोप
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागामार्फत आयोजित ‘डिजिटल केमिस्ट्री सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन फॉल केमिस्टस’ या अभ्यासक्रमाचा समारोप व प्रमाणपत्र वितरण उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्रा. डॉ. दत्ता पाटील होते. स्नेहल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कोर्स समन्वयक प्रा. अभिजित इंगळे यांनी अभ्यासक्रमाचा परिचय करून दिला. रसायनशास्त्र विभागप्रमुख लेफ्टनंट ए. जी. गोडघाटे यांनी स्वागत केले. पीजी समन्वयक म्हणून प्रा. पंकज ढाफळे यांनी तर यूजी समन्वयक म्हणून प्रा. अभिजीत इंगळे यांनी कार्यभार सांभाळला. विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स डेटा व्हिज्युअलायझेशनचे प्रशिक्षण दिले. या कोर्समध्ये पदवी व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रा. गोडघाटे, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. ऋषिकेश पाटील उपस्थित होते. प्रा. पंकज ढाफळे यांनी आभार मानले.
--------------------------------------------
35487
शंकर खाडे
योगशिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. खाडे
गडहिंग्लज ः हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील प्रा. शंकर खाडे यांची महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृणाल महाजन, प्रा. सदानंद वाली व प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र दिले. प्रा. खाडे ग विद्याधाममध्ये पूर्वीपासून कार्यरत आहेत. आजही तेथे ते नियमितपणे योगाचे वर्ग घेतात. योगासने आणि प्राणायामासोबतच रुग्णांना आवश्यक ती संसाधने उपलब्ध करून देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. संस्थेचे अध्यक्ष अरविंद कित्तुरकर यांच्याहस्ते त्यांचा गौरव झाला.
---------------------------------------------
गडहिंग्लजमध्ये नादवेद शिबिर उत्साहात
गडहिंग्लज ः ‘संगीत हे मानवी भाव व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम असून, यामुळे सकारात्मकता वाढीस लागते,’ असे प्रतिपादन डॉ. शशिकांत मोहिते यांनी केले. येथील अनुराग संगीत विद्यालयातर्फे आयोजित नादवेद शिबिरात ते बोलत होते. हे शिबिर माध्यमिक पतसंस्थेच्या सभागृहात झाले. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ तबलाशिक्षक संभाजी परीट व ह.भ.प. नामदेव सुतार यांच्याहस्ते झाले. संदीप सोनटक्के व पांडुरंग परीट यांनी मार्गदर्शन केले. मृण्मयी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय लोहार यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गुरव यांनी आभार मानले. गडहिंग्लज, आजरा, गारगोटीतील विद्यार्थ्यांनी कला सादर केली. जालिंदर शिंदे व स्वरूप लोहार यांनी तबलासाथ, तर प्रज्ञा कुंभार व मोहन मिस्त्री यांनी हार्मोनियम साथ दिली. किशोर कांबळे, बबन कोळी, अंकुश पोतदार, मनीषा पाटील, डॉ साळुंखे, उदय कुंभार, दिलीप कुंभार उपस्थित होते.
-------------------------------------------
35490
गडहिंग्लज ः अस्मिता तेरणीच्या सत्कारप्रसंगी उपस्थित डॉ. दत्ता पाटील, महेश कदम, डॉ. नागेश मासाळ, हरिभाऊ पन्हाळकर आदी.
धर्मादाय निरीक्षक तेरणीचा सत्कार
गडहिंग्लज ः येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी अस्मिता अप्पासाहेब तेरणी हिची सरळ सेवेमधून धर्मादाय आयुक्तालयामध्ये निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला. सध्या त्या गुहाघर येथे ग्राममहसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी कालवा निरीक्षक व महसूल सहायक पदावर काम केले आहे. डॉ. नागेश मासाळ, हरिभाऊ पन्हाळकर, प्रा. महेश कदम, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश देवगोंडा, प्रा. संतोष बाबर, जगन गायकवाड, अमित कुलकर्णी, निकिता भोईटे, स्नेहा पाटील, नाझिया बोजगर, नयन भोकरे, स्वाती शिंदे, ऋतुजा तोडकर आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------
ओंकारमध्ये शिक्षक प्रशिक्षण उत्साहात
गडहिंग्लज ः येथील ओंकार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता कक्षातर्फे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात झाला. शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी रायकर प्रमुख मार्गदर्शक होते. समाजात भोंदूबाबा व अंधभक्त निर्माण होऊ द्यायचे नसतील तर शिक्षकांनी डोळस विद्यार्थी घडविले पाहिजेत, असे मत डॉ. रायकर यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी स्वागत केले. प्रा. संतोषी कनगुटकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजीवनी पाटील यांनी आभार मानले.
----------------------------------------------
तेगीनहाळला कबड्डी स्पर्धा उत्साहात
गडहिंग्लज ः तेगीनहाळ (ता. गडहिंग्लज) येथे हनुमान जयंतीनिमित्त ६० किलो वजनीगटाच्या कबड्डी स्पर्धा उत्साहात झाल्या. स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले होते. जय हो ग्रुपच्या वतीने स्पर्धांचे आयोजन केले होते. विजयी संघांना सुरेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विशेष कामगिरी केलेल्या खेळाडूंनाही वैयक्तिक पारितोषिकाने गौरविण्यात आले. यावेळी दत्तात्रय कांबळे, आप्पाजी नौकूडकर, मनोहर चौगुले आदींच्या हस्ते गणेशमूर्ती व रोख पारितोषिक देऊन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. हनुमान जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचेही आयोजन केले होते. यावेली पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थित होते.
--------------------------------------------
शिप्पूर तर्फ नेसरीत हिंदू संमेलन
नेसरी ः शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे हिंदू संमेलन झाले. हिंदू जनजागरण समितीच्या प्रचारक विजया वेसणेकर यांनी, हिंदू धर्मातील परंपरा, चांगले विचार आपण विसरत आहोत. या उलट पाश्चात्त्य देशांतील लोक हिंदू संस्कृतीतील काही संस्कार स्वीकारत असून, आपल्यातील युवावर्ग मात्र पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहेत, असे मत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौशिक पाध्ये, अनिल आढावकर यांचेही मार्गदर्शन झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, प्रा. एस. एस. मटकर यांनी मनोगत व्यक्त केले. रामदास गुरव यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय गुरबे यांनी आभार मानले. आदल्या दिवशी सायंकाळी गणूचीवाडी येथील महिलांचा हरिपाठ तसेच हिंडलगा येथील शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर आणि सहकारी यांच्या ‘सह्याद्रीचा सिंह गर्जतो’ हा शाहिरी कार्यक्रम झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.