विरोधकांकडून शहरवासीयांची दिशाभूल
नगराध्यक्ष चराटी ः आजऱ्यात सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर निशाणा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १० ः ‘सत्ताधारी आघाडी आजरा शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असून, विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आंदोलनाचे हत्यार उपसून शहरातील विकासकामे आपल्याच पाठपुराव्यामुळे सुरू होत असल्याचा कांगावा विरोधक करत आहेत. कोणतेही काम किंवा प्रश्न एका दिवसात मार्गी लागत नाहीत. आमच्याकडून सतत सुरू असलेला पाठपुरावा कारणीभूत आहे. विरोधी नगरसेवक केवळ प्रसिद्धीचे ढोंग करून आजरा शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत,’ असा आरोप नगराध्यक्ष अशोक चराटी यांनी केला.
विरोधक सत्ताऱ्यांना कचरा, पाणीप्रश्नी बदनाम करत आहेत. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेऊन विकासकामांचे नारळ फोडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत चराटी बोलत होते.
नगराध्यक्ष चराटी म्हणाले, ‘विरोधक आपणच काम करून आणले असा दिखावा करत आहेत. त्यांच्याकडून नगरपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप वाढत चालला आहे. अधिकाऱ्यांवर अरेरावी सुरू आहे. यापूर्वी शहरात अधिकारी नव्हते, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून नगरपंचायतीला अधिकारी मिळाले आहेत. विरोधकांच्या अरेरावीमुळे अधिकारी जर गेले, तर पुन्हा मिळणे कठीण होऊन बसेल. शहरात सध्या सुरू असलेली विकासकामे मागील सभागृहाची आहेत. त्याचे सर्व श्रेय पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना जाते. मंत्री आबिटकर यांना पत्रे देऊन फोटो काढून विरोधक प्रसिद्धीचे ढोंग करत आहेत. शहरवासीयांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळेच त्यांनी मला नगराध्यक्ष केले. आम्ही प्रसिद्धीच्या मागे न लागता शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करत आहोत. पाणी, रस्ते व कचरा या प्रश्नांची बऱ्यापैकी सोडवणूक केली आहे. निवडणुकीत दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नगराध्यक्षांना वगळून विकासकामांचे नारळ फोडायचे हे योग्य आहे का? अधिकाऱ्यांवर दादागिरी करण्यापेक्षा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. गेल्या सभागृहात आम्ही समझोता एक्सप्रेसने काम करीत शहराचा विकास साधला आहे. विरोधकांकडून शहराचीच बदनामी होत आहे.’
यावेळी उपनगराध्यक्ष पूजा डोंगरे, नगरसेवक परेश पोतदार, अनिकेत चराटी, नगरसेविका अश्विनी चव्हाण, निशांत चाँद, आसावरी खेडेकर, पूनम लिचम, बाळ केसरकर, संजय चव्हाण, समीर चाँद, आरिफ खेडेकर, महेश खेडेकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.