घाळी कॉलेजमध्ये फुले जयंती
गडहिंग्लज ः येथील डॉ. घाळी कॉलेजमधील अर्थशास्त्र विभागातर्फे महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व विचारमंथन कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. दत्ता पाटील होते. स्नेहालय बहुउद्देशीय संस्थेचे महादेव कातकर व वंदना कातकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. डॉ. पाटील यांनी फुले यांनी महाराष्ट्रात घडवून आणलेल्या सामाजिक परिवर्तनाचा आढावा घेतला. फुलेंच्या स्त्रीशिक्षण, शेतकरी कल्याण, जातीव्यवस्थे विरोधातील लढा आणि सामाजिक समतेसाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. विद्यार्थी प्रतिनिधी तन्मय छत्रे-पाटील, प्रा. कल्लाप्पा जोशी, पांडुरंग कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. राजश्री म्हंकावे यांनी सूत्रसंचालन केले. महेश वंडकर यांनी नियोजन केले. प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
---------------------------
‘शिवराज’मध्ये फुले यांची जयंती
गडहिंग्लज ः येथील शिवराज महाविद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांची जयंती उत्साहात झाली. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी मार्गदर्शन केले. फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका प्रा. बिनादेवी कुराडे व डॉ. व्ही. पी. कळसगोंडा यांच्या हस्ते झाले. डॉ. एस. डी. सावंत यांनी स्वागत केले. डॉ. नरसिंग ईकिले यांनी महात्मा फुलेंच्या वैचारिक योगदानाचा आढावा घेतला. रिया वाघेला राजर्षी शाहू गुणवत्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. कुराडे यांच्या हस्ते सत्कार झाला. सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, प्रा. आझाद पटेल, प्रा. आर. डी. कमते यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. रंगराव हेंडगे यांनी आभार मानले.
---------------------------
‘ओंकार’मध्ये महात्मा फुलेंना अभिवादन
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांना अभिवादन करण्यात आले. नारायण जोशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. प्रा. क्रांती शिवणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. काशीनाथ तनंगे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला. रेखा पोतदार, प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्रा. कविता पोळ यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. श्रीकृष्ण मोरे यांनी आभार मानले.
-----------------------------
मुखर्जी ग्रंथालयात फुले जयंती
गडहिंग्लज : येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी ग्रंथालय व अभ्यासिकेत महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. संस्थेचे अध्यक्ष संदीप नाथबुवा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी फुलेंच्या कार्याला उजाळा देण्यात आला. संचालक अशोक पट्टणशेट्टी, अशोक पाटील, किरण कापसे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
...................................
गडकरी कॉलेजमध्ये सॅम्युअल जयंती
गडहिंग्लज ः येथील ई. बी. गडकरी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात होमिओपॅथी शास्त्राचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांची २७१ वी जयंती साजरी करण्यात आली. प्र. प्राचार्य डॉ. जी. आर. फगरे अध्यक्षस्थानी होते. डॉ. फगरे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात डॉ. हॅनेमन यांच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. हॅनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ. सुयोग शिवारे यांनी मनोगत व्यक्त केले. आलशफा किल्लेदार, अर्चना राठोड यांनी होमिओपॅथीचे महत्त्व सादर केले. विद्यार्थ्यांनी हॅनेमन यांच्या जीवनकार्यावर एकांकिका, भित्तीपत्रिका व माहितीपट सादर केले. तन्वी कांबळे, रक्षंधा घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कपिल पाटील यांनी आभार मानले.
-------------------------------------
बेळगुंदी सेवा संस्थेला २० वर्षांनंतर नफा
गडहिंग्लज : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील श्री बाल हनुमान विकास सेवा संस्था २० वर्षांनंतर प्रथमच नफ्यात आली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेला सात लाख ९९ हजार ८९६ रुपयांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष ॲड. प्रबोध पाटील यांनी दिली. बाल हनुमान विकास सेवा संस्थेत गतवर्षी सत्तांतर झाले. सत्तेत आल्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्याच वर्षी संस्था नफ्यात आणली. मागील २० वर्षांत संचित तोटा सहा लाख ६५ हजार ८९ रुपये होता. तो वजा जाऊन संस्थेला एक लाख ३४ हजार ३०७ रुपये निव्वळ नफा झाला आहे. योग्य नियोजन, पारदर्शक कारभारामुळे संस्था वीस वर्षांनंतर नफ्यात आल्याचे ॲड. पाटील यांनी सांगितले. बैठकीला उपाध्यक्ष मारुती केसरकर, सर्व संचालक कर्मचारी, सभासद उपस्थित होते.
------------------------------
महालक्ष्मी पतसंस्थेला सात लाखांचा नफा
गडहिंग्लज : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी बिगर शेती सहकारी पतसंस्थेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात सात लाख ३९ हजार ५७७ रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल १२ लाख १६ हजार ८०० रुपये आहे. दोन कोटी २७ लाख ५४ हजार ४९८ रुपयांच्या ठेवी असून, एक कोटी ६० लाख ४१ हजार ४६५ रुपयांचे कर्जवाटप केले आहे. स्वगुंतवणूक एक कोटी पाच लाख ६० हजार १८५ रुपयांची आहे. सलग तिसऱ्या वर्षी सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याचा मानस अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष संभाजी साळवी यांच्यासह संचालक, कर्मचारी उपस्थित होते.
---------------------------------
सुखदा पाटीलचे निबंध स्पर्धेत यश
गडहिंग्लज : येथील किलबिल विद्या मंदिरची विद्यार्थिनी सुखदा पाटील हिने निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. सुखदाने पाचवी ते सातवीच्या गटात यश मिळविले. तिला संस्थेच्या अध्यक्षा अंजली हत्ती, सचिव डॉ. सरस्वती क्षीरसागर, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे यांचे प्रोत्साहन तर वर्ग शिक्षिका वैशाली जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.