36881
गडहिंग्लज : कडक उन्हामुळे काकडीला मागणी वाढली असून, दर तेजीत आहेत. (आशपाक किल्लेदार, सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------
लोगो ः गडहिंग्लज आठवडा बाजारभाव
बिन्स, हिरवी मिरची, काकडी तेजीत
भाजी मंडईला उन्हाच्या झळा : आले, लसूण दर स्थिर; हाफूसची आवक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : येथील भाजी मंडईत बिन्स, हिरवी मिरची, काकडीचे दर तेजीत आहेत. उन्हाच्या झळा वाढल्याने भाजीपाला, फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने आवक कमी होऊन दर वधारले आहेत. ग्राहकही खरेदीसाठी सायंकाळी चारनंतरच गर्दी करू लागले आहेत. कोबी, टोमॅटोचे भाव उतरले आहेत. आले, लसणाचा दर स्थिर आहे. फळबाजारात कोकणातील हाफूस आंब्याची आवक वाढत आहे. मागणी घटल्याने जनावरांच्या बाजारात उलाढाल मंदावली आहे.
उन्हाळ्यामुळे पालेभाज्या, फळभाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. बिन्सच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत किलोमागे ३० रुपयांनी वाढ झाल्याचे विक्रेते स्वप्नील डोमणे यांनी सांगितले. हिरव्या मिरचीचा ठसका कमी होत किलोमागे दर २० रुपयांनी उतरून ८० झाला आहे. कडक उन्हामुळे काकडीची मागणी टिकून आहे. किलोचा दर ६० ते ८० रुपये आहे. कमी आवकेमुळे पालेभाज्या, कोथिंबिरीचा दर सरासरी २० रुपये पेंढी असा आहे. आले, लसूण, कांदा, बटाटा यांचे दर स्थिर आहेत. आले शिमोगा ५५ ते ६०, सातारी ४५ ते ५० रुपये किलो आहेत. लसूण आकारानुसार ६० ते १८० रुपये किलो आहे. कांदा १० ते २५, बटाटा इंदूर २५ ते ३० तर आग्रा २० ते २५ रुपये किलो असा दर आहे.
कोबी नगाला १० ते १५, तर टोमॅटो २० ते २५ रुपये किलो आहे. वांग्याचा दरही उतरला असून, ३० ते ४० रुपये किलो असा आहे. चिंचेची आवक वाढून प्रतवारीनुसार २५ ते ३५ रुपये किलो भाव आहे. फळबाजारात वाढलेले परदेशी फळांचे दर कायम आहेत. सफरचंद २०० रुपये किलो, किवी १५० रुपये बॉक्स असा दर आहे. माल्टा, चिक्कू, पेरू १०० रुपये किलो आहेत. डाळिंब १५० ते २०० रुपये किलो आहे. कोकणातून हाफूस आंब्याची आवक वाढत असून, डझनाचा दर्जानुसार दर ७०० ते १००० रुपये असा आहे. कैरी आंबे ८० ते १०० रुपये किलो आहेत. द्राक्षांची आवक कमी होत असून , १०० रुपये किलो आहेत. जनावरांच्या बाजारात उन्हाळ्यामुळे गेल्या महिनाभरापासून मागणी कमी आहे. म्हशीची ४०, तर शेळ्या-मेंढ्यांची ३० हून अधिक आवक नोंदल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
..................
चौकट...
हिरवा वाटाणा महागला
हिरवा वाटाण्याचा हंगाम संपत आला आहे. परिणामी, आवक कमी झाली आहे. मात्र, मागणी कायम असल्याने दर वाढले आहेत. यंदा जानेवारीपासून हिरवा वाटाणा मंडईत आला. सुरुवातीला दर अधिक होते; पण आवक सुरळीत झाल्यावर ६० ते ८० रुपयांपर्यंत किलोचा दर होता. आता हंमाम संपत आल्याने गेल्या दोन आठवड्यांत किलोमागे ४० ते ५० रुपयांनी वाढ होऊन १३० ते १५० रुपयांपर्यंत दर पोहचले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.