अखेर प्रांताधिकाऱ्यांनी बोलावणे धाडले
गडहिंग्लज-चंदगड रस्ता रूंदीकरण ः ‘आजरा-महागाव-हलकर्णी’वरही होणार चर्चा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० ः गारगोटी-नागनवाडी राज्यमार्गापैकी गडहिंग्लज ते नागनवाडी दरम्यानच्या रस्त्याचे व आजरा-महागाव-हलकर्णी रस्त्याचे रूंदीकरण सुरू आहे. याबाबत नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारी व ‘सकाळ’मधील बातमीची दखल घेऊन प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी अखेर संयुक्त बैठकीचे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना बोलावणे धाडले आहे. बुधवारी (ता. २२) दुपारी बारा वाजता प्रांतांच्या कक्षात ही बैठक होईल.
गडहिंग्लज ते नागनवाडी रस्ता रूंदीकरणाचे काम पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे सुरू आहे. कामाची कासवगती, अपघात प्रतिबंधक उपाययोजनांतील त्रुटी, सर्व खोदाई एकाचवेळी करीत असल्याने वाहतुकीला होणारा अडथळा, धुळीचा त्रास, वळीव पावसाने होणारा चिखल आदी समस्यांमुळे या मार्गावरील गावागावांतील जनता हैराण झाली आहे. इतका त्रास जनतेला होऊनही ठेकेदाराच्या कामात कोणतीच सुधारणा नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले. त्यानंतर नेसरी ग्रामपंचायतीनेही कामाबाबत नाराजी व्यक्त करीत प्रांतांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते. तसेच ‘सकाळ’नेसुद्धा ‘रस्ता कामात प्रशासनाचा हस्तक्षेप हवा’ या शीर्षकाखाली बातमीही प्रसिद्ध केली होती. लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, नागरिकांच्या तक्रारी व बातमीची दखल घेऊन प्रांतांनी बैठक बोलावली आहे.
दरम्यान, आजरा-महागाव-हलकर्णी राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरण कामामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कामाची संथगती आणि धुळीचा त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. याबाबतच्या तक्रारी पंचायत समितीच्या सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी प्रांतांकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. गडहिंग्लज ते चंदगड रस्त्यासह आजरा-हलकर्णी रोडच्या कामावर चर्चा करण्यासाठी पायाभूत विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसीचे पथक प्रमुख, ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक यांना या बैठकीला पाचारण केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.