38722
सकाळ बातमीची इमेज
.......................
‘महालक्ष्मी’चरणी पाच कोटींचा निधी
गडहिंग्लजला मंदिराचा विकास ः शंभर टक्के निधीचे शासन शुद्धिपत्रक प्राप्त
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ ः येथील श्री महालक्ष्मी मंदिर विकासाला मंजूर झालेल्या पाच कोटींतील ५० टक्के हिस्सा नगरपालिका व देवस्थान ट्रस्टने जमा करावा, या शासन अटीमुळे विकासकामे रेंगाळली होती. आता शासनानेच स्वतंत्र दुरुस्ती अध्यादेशाने १०० टक्के म्हणजेच पाच कोटींचा निधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजुरी मिळाल्याची माहिती महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी दिली. यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
मंदिर विकासासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने पहिल्या टप्प्यात सव्वा कोटीचा निधी मंजूर झाला. दुसऱ्या टप्प्यातही पाच कोटींचा निधी मंजूर केला होता; परंतु यातील ५० टक्के खर्च नगरपालिका व संबंधित देवस्थान ट्रस्टने करावा, अशी अट होती. मात्र, कुवत नसल्याने ट्रस्टी व नगरपालिकेने आपल्या हिश्श्याची प्रत्येकी सव्वा कोटीची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली. दरम्यान, निधीअभावी आठ महिने मंदिराची विकासकामे रेंगाळली होती. भाविक १०० टक्के निधीच्या शासनाच्या शुद्धिपत्रकाच्या प्रतीक्षेत होते. देवस्थान ट्रस्टी व पालिकेची झालेली कोंडी, भाविकांतील नाराजी व १०० टक्के निधी शासनानेच द्यावा, याबाबत ‘सकाळ’नेही बातमीद्वारे वारंवार पाठपुरावा केला होता.
ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तारळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची भेट घेऊन दोन्ही अटी रद्दची मागणी केली होती. त्यानुसार मंत्री पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन पालिकेच्या सव्वा कोटीचा, तर मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून देवस्थानच्या सव्वा कोटीचा हिस्सा रद्द करून घेतला. त्यामुळे आता शासनानेच पाच कोटींचा निधी देण्यास मंजुरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मंदिराच्या कामाला उत्साहाने प्रारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे एल. डी. पोवार, अरविंद कित्तूरकर, सुरेश कोळकी, अरुण तेलंग, राजेंद्र मांडेकर, अनिल कुंभार, यशवंत कुंभार, प्रशांत हिरेमठ, शंकरराव पाटील, दशरथ लोहार, मल्लिकार्जुन बेल्लद आदी उपस्थित होते.
........
कोट...
महालक्ष्मी मंदिराचा गाभारा, शिखर व कळसाचे काम ट्रस्टने लोकसहभागातून ६० लाख रुपये खर्चून दोन वर्षांपूर्वीच पूर्ण केले आहे. आता पाच कोटी निधीला शासनाने मंजुरी दिल्याने विकासाला गती येईल. दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामे यातून होतील.
- राजेंद्र तारळे, अध्यक्ष,
महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट गडहिंग्लज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.