39151
लोगो ः गडहिंग्लज पंचायत समिती सभा
------------------------------
तुम्ही लक्ष ठेवा, नाहीतर आम्ही भागात फिरतो
खतांच्या लिंकिंगवर पदाधिकाऱ्यांची भूमिका : धोकादायक विहिरींचा प्रस्ताव देण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : खरीप हंगाम तोंडावर आहे. खतांचा कागदावरील स्टॉक सांगू नका. प्रत्यक्षात खतांचा विशेषत: युरियाचा तुटवडा जाणवत आहे. तुम्ही माहिती घ्या. जागेवर जाऊन स्टॉकची तपासणी करा. दुकानदारांकडून लिंकिंगचे खत शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले जात आहे. त्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवा, नाहीतर आम्ही भागात फिरतो, अशी भूमिका घेत सदस्य शिवगोंडा पाटील यांनी कृषी विभागाच्या कारभाराचा समाचार घेतला. रस्त्याशेजारी असणाऱ्या धोकादायक विहिरींचा प्रस्ताव देण्याची सूचनाही आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत केली. सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या.
कृषी विभागाच्या आढाव्यात शिवगोंडा पाटील यांनी उपस्थित केलेल्या खतांच्या तुटवड्याच्या मुद्द्याला स्नेहल जाधव यांनीही दुजोरा दिला. लिंकिंगच्या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. स्वप्नील इंगवले यांनी यामध्ये दुकानदारांचेही नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधले. हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा प्रस्ताव दिल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आता प्रस्ताव दिला आहे, मग ते मिळणार कधी, जून-जुलैला प्रकाश सापळे घेऊन काय शेतकऱ्यांनी गळ्यात घालून फिरायचे का, अशा शब्दांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढाव्यात रस्त्याकडेच्या १० विहिरी धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. तेथे संरक्षक कठडा बांधण्यासाठी प्रस्ताव देण्याची सूचना सभापती चव्हाण यांनी केली. वनरक्षक सागर पोवार यांनी वन विभागाचा आढावा घेतला. काळभैरव डोंगरावरील विकासकामात अडथळा आणला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. चांगले काम करूनही अधिकाऱ्यांची बदनामी केली जात असेल तर आम्ही काम करायचे कसे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. याबाबत संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन सभापती चव्हाण यांनी दिले.
गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. सहायक गटविकास अधिकारी विलास पाटील यांनी स्वागत केले. सारिका बटकडली यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. प्रभावती बागी यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. उपसभापती अमर हिडदुगी, सदस्य शिवाजी करिगार, सुनीता देसाई, रूपा केसरोळी आदी उपस्थित होते.
..........
चौकट...
कडगावचा पाणी प्रश्न सभागृहात...
सरिता बटकडली यांनी कडगाव गावातील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. जीवन प्राधिकरणच्या योजनेत तलावातील पाणी घेतले जात आहे. त्यामुळे गावाला गढूळ पाणीपुरवठा होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर ग्रामपंचायतीला सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या पाळल्या नसल्याचे बटकडली यांनी निदर्शनास आणून दिले. पाण्याचे नमुने घेतले आहेत; पण अद्याप त्यांचा अहवाल मिळाला नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.