सक्ती करू नका, संमतीने घ्या
ग्रामस्थ, ग्राहकांची भावना ः पेरणोलीत स्मार्ट मीटरबाबत संवाद मेळावा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २३ ः स्मार्ट मीटर बससिण्याबाबत कोणावर सक्ती करू नका. संबंधिताच्या संमतीने मीटर बसवा. स्मार्ट मीटरबाबत संबंधिताला पूर्ण माहिती द्यावी, अशी भावना ग्रामस्थ व ग्राहकांनी व्यक्त केली. येथील हनुमान मंदिरात वीज वितरणकडून स्मार्ट मीटरबाबत संवाद मेळावा झाला.
वीज वितरण कंपनीच्या गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पोवार अध्यक्षस्थानी होते. श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्याध्यक्ष काॅ. संपत देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई, पेरणोलीचे उपसरपंच संकेत सावंत, सहायक अभियंता सुशांत शिवणे, दीपक जमुने प्रमुख उपस्थित होते.
शिवणे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात बैठकीचा हेतू स्पष्ट केला. संजय पोवार म्हणाले, ‘केंद्राच्या विद्युत प्राधिकरणाने स्मार्ट मीटर बसविण्याबाबत बंधनकारक केले आहे. त्यामुळे ग्राहक जेवढा विजेचा वापर करेल तेवढेच वीज बिल येईल. पूर्वीचे मीटर व स्मार्ट मीटरमध्ये फारसा फरक नाही. काही तांत्रिक दोष असल्यास मीटर तपासून मिळले. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक असून, ग्राहकाला त्याच्या विजेच्या वापराबाबतची माहिती तासागणिक मोबाईमधील ॲपवर उपलब्ध होईल. त्याचबरोबर बिलही उपलब्ध होईल. यामध्ये तक्रार करण्याची तरतूदही आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरबाबतचा गैरसमज दूर व्हावा. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत ८५ पैसे प्रतियुनिट दराने घरगुती ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यात येत आहे. स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांना सात लाख ४२ हजार रुपयांची सवलत मार्च महिन्यात मिळाली आहे.’
काॅ. संपत देसाई म्हणाले, ‘स्मार्ट मीटरला विरोध नाही. वीज वितरणने मीटर बसविणे गरजेचे आहे. याचे पैसे खासगी उद्योजकांच्या खिशात जायला नकोत. त्याला आमचा विरोध आहे.’ तानाजी देसाई यांनीही शंका उपस्थित केल्या. यावेळी सुरेश कालेकर, मारुती देसाई, ज्ञानोबा फगरे, बाबूराव देसाई, रोहिदास दारुडकर, बाळासाहेब पाईम, विष्णू दारुडकर, संजय कालेकर यांच्यासह ग्राहक, ग्रामस्थ उपस्थित होते.
...................
चाैकट...
गडहिंग्लज विभागात ८६ टक्के स्मार्ट मीटर
गडहिंग्लज विभागात घरगुती व व्यापारी एक लाख ५० हजार ३०० ग्राहक आहेत. यापैकी एक लाख २९ हजार ६०९ ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविले आहेत. सुमारे ८६ टक्के स्मार्ट मीटर बसवलेली आहेत. स्मार्ट मीटरबाबत विशेष तक्रारी दिसून आल्या नसल्याचे संजय पोवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.