39222
गडहिंग्लज ः कडगाव रोडवरील पारकट्टा सुशोभीकरणाच्या चौकशीसाठी भाजपने आंदोलन केले. यावेळी स्वाती कोरी, अनिता खोत, बिनादेवी कुराडे, प्रीतम कापसे आदी उपस्थित होते.
---------------------------------------
पारकट्टा सुशोभीकरणाची
चौकशी करा ः भाजप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ ः गारगोटी-नागनवाडी राज्यमार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. हा मार्ग शहरातून जातो. कडगाव रोडवरील एमआर हायस्कूलच्या समोर असलेल्या वडाच्या झाडाचा पारकट्टाही रस्त्यात संपादनाची शक्यता आहे. असे असूनही पारकट्ट्याचे सुशोभीकरण करून कोणाचे खिसे भरले जात आहेत, असा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले.
एमआर प्रशालेच्या चौकात घोषणांमुळे हा चौक दणाणून गेला होता. ‘लाखोंचा पारकट्टा कशासाठी, ढपला पाडण्यासाठी’ अशा घोषणा दिल्या. नागरिकांच्या पैशातून होणारा पारकट्ट्याचा विकास रस्ता रूंदीकरणात संपादन होणार असेल तर त्यासाठी पालिकेचा इतका अट्टहास का, घाईने काम करण्याची गरज काय होती, असा प्रश्नही नगरसेविका स्वाती कोरी यांनी केला. या कामासाठी १३ लाख ५२ हजारांचे अंदाजपत्रक आहे. जुन्याच पारकट्ट्याला बाहेरून सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे या कामाची व खर्चाची चौकशी करावी, अशी मागणीही केली. भाजपचे मंडल अध्यक्ष प्रीतम कापसे यांनीही रस्ता रूंदीकरणात संपादन होणाऱ्या जागेचा विकास कोणासाठी सुरू आहे, हे जनतेला माहीत असल्याचा आरोप केला. शहराध्यक्ष संदीप कुरळे यांनीही कामावरील झालेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी यावेळी केली. याबाबत नगरसेविका अनिता खोत यांनी यापूर्वीच दिलेल्या निवेदनाकडेही दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन चौकशी करण्याची गरज व्यक्त केली. नगरसेविका अनिता खोत, नितीन देसाई, बिनादेवी कुराडे, आप्पा शिवणे, संदीप नाथबुवा, आशा देवार्डे, कुमार पाटील, संग्राम आसबे, अशोक शिंदे, सचिन घुगरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
--------------------------------------------
39223
गडहिंग्लज ः भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पारकट्ट्यासमोर एकत्रित आले होते.
चौकशीला सामोरे जाण्याची
तयारी ः राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ ः भारतीय संस्कृतीत वडाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. माताभगिनींकडून दरवर्षी त्याची पूजा होते. अशा वडाच्या झाडाला असलेला पारकट्टा खराब झाल्याने त्याचे सुशोभीकरण केले आहे. भारतीय संस्कृती टिकविण्यासाठीच पालिकेने हा निर्णय घेतला. परंतु कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी आरोप करणे चुकीचे आहे, असे प्रत्युत्तर पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, उपनगराध्यक्ष महेश सलवादे, बसवराज खणगावे, सिद्धार्थ बन्ने, गुंड्या पाटील, नरेंद्र भद्रापूर, अमर मांगले, विठ्ठल भमानगोळ, रश्मीराज देसाई, प्रणिता देवार्डे, रमेश तिकोडे आदी उपस्थित होते. पारकट्ट्यासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. या कामाचे अंदाजपत्रक १३ लाख ५२ हजारांचे असले तरी त्या सुशोभिकरणात विविध कामांचा समावेश आहे. परंतु, जागेची स्थिती पाहून केवळ पारकट्ट्याचे सुशोभीकरण झाले आहे. त्याचा खर्च ३ लाख ८५ हजारांचा झाला आहे. इतकीच रक्कम या कामावर खर्च झाल्याचे खणगावे यांनी सांगितले. वीस वर्षे सत्तेत असूनही अंदाजपत्रकीय किंमत व प्रत्यक्ष खर्चाचा अभ्यास नसणे म्हणजे दुर्दैव असल्याची खंत सिद्धार्थ बन्ने यांनी व्यक्त केली. भारतीय संस्कृतीत महत्त्वाच्या अशा वडाच्या झाडाच्या संवर्धनाचा हेतू या सुशोभिकरणामागे आहे. विरोधकांनी याची आणखी कोणतीही माहिती मागावी, आम्ही द्यायला तयार आहे. समाजासमोर चुकीचे मांडून दिशाभूल करणे निषेधार्ह आहे. कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ, असे नगराध्यक्ष तुरबतमठ यांनी स्पष्ट केले. नरेंद्र भद्रापूर यांनीही या सुशोभीकरण कामाची वस्तुस्थिती मांडून कोणीही याबाबत दिशाभूल न करण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.