39541
कचरा नव्हे, ही तर समृद्धी!
‘पुनर्चक्रीकरणाची भिंत’ उपक्रमाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : ‘कचरा म्हणजे केवळ टाकाऊ वस्तू नव्हे, तर योग्य व्यवस्थापन केल्यास ती एक संपत्ती ठरू शकते,’ हा विचार कोल्हापूरकरांनी कृतीतून सिद्ध केला आहे. शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी दसरा चौक येथे सुरू केलेल्या ‘पुनर्चक्रीकरणाची भिंत’ या उपक्रमाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
रस्त्याच्या कडेला किंवा प्रवासादरम्यान कचरा फेकण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे शहराचे सौंदर्य आणि आरोग्य धोक्यात येत आहे. हीच बाब लक्षात घेऊन अवनि संस्था, एकटी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव मोहिमेचा श्रीगणेशा झाला. केवळ उद्घाटन करून न थांबता, पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या सजग नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या वस्तूंचे संकलन केंद्रावर दान केले.
या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी संकलनाचा आकडा थक्क करणारा होता. सुमारे ५० किलो ई-वेस्ट (इलेक्ट्रॉनिक कचरा), १० किलो प्लास्टिकच्या वस्तू, जुनी वस्त्रे, रद्दी, चप्पल-बूट, भांडी आणि खेळणी अशा अनेक वस्तू संकलित केल्या. विशेष म्हणजे, या उपक्रमामुळे कचरा वेचक महिलांच्या को-ऑपरेटिव्हला आधार मिळाला असून, या वस्तूंच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कोल्हापूरच्या नागरिकांनी यापुढेही दर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या शनिवारी दसरा चौक व राजारामपुरी केंद्रांवर ई-वेस्ट आणि जुन्या वस्तू जमा करून प्रदूषणमुक्त कोल्हापूरसाठी हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.
----
कपड्यांपासून पायपुसणी,
कागदांपासून पाकिटे
जमा झालेल्या या साहित्याचा आता ‘पुनर्वापर’ केला जाणार आहे. जुन्या कपड्यांपासून टिकाऊ पिशव्या आणि पायपुसणी तयार केली जातील, तर कागदापासून आकर्षक पाकिटे बनवली जाणार आहेत. या सर्व पुनर्चक्रित वस्तूंचे प्रदर्शन ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने भरवण्यात येणार आहे.
---
कोट
प्रत्येक वॉर्डमध्ये अशी पुनर्चक्रीकरणाची भिंत उभी केल्यास कचऱ्याचा प्रश्न सुटू शकेल. अजूनही दोन ते तीन प्रभागांत हा उपक्रम सुरू होणार आहे.
- वनिता कांबळे, प्रकल्प समन्वयक, अवनि
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.