नमो शेतकरी महासन्मान
योजनेचे दोन हप्ते जमा करा
रिपब्लिकन सेनेची आजरा तहसीलदारांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ४ ः ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजनेचा नववा व दहावा असे दोन हप्ते राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने केली आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा नववा व दहावा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी समान तीन टप्प्यांत मिळतात. मात्र, राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचे मार्च २०२६ व जुलै २०२६ चे दोन्ही हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. शेतीला लागणारे बी-बियाणे, खते व शेतीपूरक गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चाला या योजनेतून हातभार लागतो. हे हप्ते वेळेत जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. तरी उर्वरीत दोन हप्ते राज्य सरकारने तातडीने वर्ग करावेत. निवेदनावर संघटनेचे विनय कांबळे, गोपाळ होन्याळकर, परशुराम कांबळे, अविनाश कांबळे, मधुकर कांबळे, शंकर कांबळे आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.