63399, 63400
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागातील कुस्ती संकुलातील सुसज्ज स्पर्धा सभागृह. दुसऱ्या छायाचित्रात विद्यापीठ परिसरात पहाटेपासून कुस्तीपटूंचा धावण्याचा सराव असतो.
......................
शिवाजी विद्यापीठ ठरतेय आधुनिक ‘कुस्ती हब’
देश-विदेशातील मल्लांना भुरळ; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटसह सर्व सुविधा एकाच छताखाली
सचिन भोसले ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : संस्थानकाळापासून ‘कुस्ती पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील मल्लांसाठी अत्याधुनिक कुस्ती केंद्र उभारले असून, आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिंपिक स्पर्धांचे ध्येय ठेवून हे केंद्र आधुनिक कुस्तीचे हब ठरत आहे. विशेष म्हणजे देशभरातील मल्लांसह परदेशातील कुस्तीगीरही या केंद्रातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी कोल्हापुरात दाखल होत आहेत.
वेग, तंत्र आणि शारीरिक क्षमता यांचा कस लागणाऱ्या कुस्तीच्या सरावासाठी विद्यापीठाने आवश्यक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. चार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटसह स्वतंत्र सभागृह, आधुनिक व्यायामशाळा, विविध प्रकारच्या सायकली, मेडिसीन बॉल, रोप आदी साधने येथे उपलब्ध आहेत. सरावासाठी विद्यापीठाचा ८५० एकरांचा परिसर मल्लांसाठी खुला असून, नैसर्गिक व कृत्रिम उंचवटे, डोंगराळ भाग, सिंथेटिक ट्रॅक आणि दोन हजारांहून अधिक तयार स्टेप्सचा उपयोग शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी केला जातो. आधुनिक कुस्तीत गतीला महत्त्व असल्याने नैसर्गिक वातावरणातील शुद्ध प्राणवायूचाही सरावासाठी उपयोग होत आहे.
या केंद्रात जय पाटील, रोहन पवार, श्रीनाथ गोरे, किशोर पवार, संकेत सरगर, जय पवार आणि संकेत पाटील यांच्यासह अनेक मल्लांची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, हैदराबाद, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमधील मल्लही येथे सरावासाठी येतात.
................
परदेशी मल्लांनाही आकर्षण
कॅनडास्थित भारतीय वंशाचे अंबिका शेरावत, बंटी शेरावत, रणवीर शेरावत, लिलू हरियाणवाला यांच्यासह सहा मल्ल महिनाभर येथे सरावासाठी दाखल झाले होते. हैदराबादचे ज्येष्ठ वस्ताद अर्जुन यांनी ४० वर्षांनंतर नातू आर्यनला तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी येथे दाखल केले. दिल्लीतील छत्रसाल कुस्ती केंद्रातील आंतरराष्ट्रीय मल्ल उमेश मथुरा यांनीही या सुविधांचा लाभ घेतला आहे.
..................
‘एनएसएनआयएस’च्या धर्तीवर नवे केंद्र
पतियाळातील एनएसएनआयएसच्या धर्तीवर क्रीडा प्रशिक्षण संस्था सुरू करण्याची तयारीही विद्यापीठाने सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक घडण्यासही मदत होणार आहे.
......................
चौकट...
खेळाडूंना आर्थिक पाठबळ
बारावीपर्यंत शिक्षण घेताना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. आतापर्यंत ६ लाख ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती वितरित झाली आहे. क्रीडा शिष्यवृत्तीअंतर्गत २०२३-२४ मध्ये १२ विद्यार्थ्यांना २ लाख ८० हजार, तर २०२४-२५ मध्ये १३ विद्यार्थ्यांना ३ लाख २० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली आहे.
...................
कोट
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी पोषक वातावरण येथे आहे. स्थानिकांसह देश-विदेशातील नामांकित मल्ल त्याचा लाभ घेत आहेत. याच केंद्रातून भावी ऑलिंपियन घडतील, अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत.
- कृष्णात पाटील, राष्ट्रीय प्रशिक्षक
......................
कोट.....
आधुनिक कुस्ती प्रशिक्षणासाठी पुण्याकडे धाव घेणाऱ्या उदयोन्मुख मल्लांचा लोंढा कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा उपयोग झाला. महाराष्ट्र केसरीपासून ऑलिंपिकपर्यंतच्या कामगिरीसाठी हे केंद्र बहुउपयोगी ठरत आहे. यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव व प्रशासनाचे सहाय्य लाभत आहे. -.
- डॉ. शरद बनसोडे, संचालक, क्रीडा विभाग, शिवाजी विद्यापीठ
.......................
दृष्टिक्षेपात...
आंतरराष्ट्रीय दर्जाचे चार मॅट
आधुनिक व्यायामशाळा व प्रशिक्षण साहित्य
क्रीडा मानसशास्त्रज्ञ, फिजिओ, आहारतज्ज्ञ कायमस्वरुपी उपलब्ध
आंतरराष्ट्रीय एनआयएस प्रशिक्षक कृष्णात पाटील, विश्र्वास हारुगले आदींचा समावेश
डब्ल्यूएफआयच्या मानांकनानुसार सुविधा
बल्गेरिया, तैवानमधील कुस्ती प्रशिक्षण केंद्रांच्या धर्तीवर क्रीडा हबची संकल्पना विकसित
आरोग्य केंद्र व वसतिगृह
सिंथेटिक ट्रॅक, डोंगराळ भाग व स्टेप्स, ८५० एकर परिसरात सरावाची मुभा
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.