उसासह रब्बी पिकांवर पाणीटंचाईचे संकट
जिल्ह्यात १ लाख ९६ हजार हेक्टरवर ऊस; पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, शेतकऱ्यांची चिंता वाढली
सुनील पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठ्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांसह रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात यंदा एक लाख ९६ हजार ६३० हेक्टरवर उसाची लागण झाली असून, सुमारे २० हजार हेक्टरवरील रब्बी पिकांनाही पाणीटंचाईचा फटका बसण्याची भीती आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागणार असल्याने शेतीच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन निर्णायक ठरणार आहे.
जिल्ह्यातील ऊस लागवडीचे क्षेत्र मोठे असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. साखर कारखाने सुरू होण्यास विलंब झाला किंवा ऊसतोड वेळेत झाली नाही, तर शेतात उभा असलेला ऊस वाळण्याचा धोका आहे. परिणामी, वजनात घटण्याबरोबरच उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो.
रब्बी हंगामालाही पाणीटंचाईची झळ
ऊस पिकाबरोबरच रब्बी हंगामातील पिकांसमोरही पाण्याचे संकट आहे. जिल्ह्यातील सुमारे २० हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. वेळेत पाणी मिळाले नाही, तर पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनात घट होणे आणि काही भागांत पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
पाण्याचे नियोजन ठरणार निर्णायक
जिल्ह्यातील एकूण १ लाख ९६ हजार ६३० हेक्टरवरील उसाला आणि रब्बी पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाटबंधारे विभागाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. पिण्याच्या पाण्याची गरज आणि शेतीसाठीची मागणी यांचा समतोल साधताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर, पाणी वितरणाचे नियोजन आणि ऊसतोडीचे वेळापत्रक यावर शेतकऱ्यांचे नुकसान किती टाळता येईल, हे अवलंबून राहणार आहे.
.....................
चौकट....
करवीर, कागल, शिरोळमध्ये सर्वाधिक ऊसक्षेत्र :
करवीर तालुक्यात २७ हजार १८०, कागलमध्ये २५ हजार ३६०, शिरोळमध्ये २५ हजार ९३८, हातकणंगलत २३ हजार ३५० आणि पन्हाळ्यात १८ हजार २६२ हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. या तालुक्यांतील मोठ्या ऊस क्षेत्रामुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर ठरू शकतो. गडहिंग्लजमध्ये १६ हजार २४७, राधानगरीत १३ हजार ३५६, शाहूवाडीत आठ हजार २६६, भुदरगडमध्ये आठ हजार ७२०, आजऱ्यात सात हजार ७५, गगनबावड्यात चार हजार ७१५ आणि चंदगडमध्ये १८ हजार १६१ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे.
..................
चौकट...
सध्या उभ्या पिकांना काही प्रमाणात पाणी मिळू शकेल; पण उन्हाचा तडाका जास्त जाणवत राहिला तर मात्र भविष्यात पिकांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जालंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, कोल्हापूर
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.