चांगल्या करिअरसाठी वाचन वाढवा
विजयसिंह भोसले : दिगंबर जैन बोर्डिंगतर्फे पर्युषण पर्व व्याख्यानमालेस प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : चांगल्या करिअरसाठी झोकून देऊन अभ्यास करत वाचन वाढवा, असा सल्ला महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह भोसले यांनी आज येथे दिला.
दिगंबर जैन बोर्डिंगतर्फे अण्णासाहेब लठ्ठे पर्युषण पर्व व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘युवकांनो जागे व्हा,’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. बोर्डिंगच्या सभागृहात त्याचे आयोजन केले होते.
भोसले म्हणाले, ‘आजचा युवक भरकटत चालला आहे. त्याला सोशल मीडियावर नक्की काय पाहायचे, वाचायचे याचे भान राहिलेले नाही. त्याला चांगले-वाईट सांगण्याची आवश्यकता आहे. तो जर व्यसनी बनला तर त्याला करिअरची वाट सापडणार नाही. महाविद्यालयीन जीवनातच त्याने करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे, हे निश्चित करायला हवे. कृषी क्षेत्रात करिअरचा मार्ग आहे. पण, त्याची आवड असणे महत्त्वाचे आहे.’
ते म्हणाले, ‘युवकांनी सुदृढतेसाठी व्यायाम करणे जरुरीचे असून, वाचनाकडे कल वाढविला पाहिजे. राष्ट्रपुरुष, समाज सुधारक, क्रांतिकारकांची चरित्रे त्यांनी वाचून काढावीत. त्याचबरोबर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवरील घडामोडींचे ज्ञानही घ्यावे. आयुष्याला दिशा द्यायची असेल तर चौफेर वाचन करायला हवे. त्याचबरोबर उद्योग करण्यासाठी प्रवृत्त व्हावे. आज महाराष्ट्रात उद्योग असले तरी उद्योगात महाराष्ट्र कोठे आहे, हे पाहावे लागेल. त्यामुळे युवकांनी नोकरी देणारे बनण्याची गरज ओळखून उद्योगांकडे वळावे.’
बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे, रवींद्र पाटील, उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील, सचिव विजयकुमार शेट्टी, अतुल होनोले, एस. पी. पाटील, प्रा. संदीप पाटील, विलास बोगार, आर. जे. पाटील उपस्थित होते. श्रेणिक लाले याने प्रास्ताविक केले. वर्धमान मगदूम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पृथ्वी मल्लीकवाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर वरद कुडचे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.