व्हनाळीत व्यसनमुक्तीसह विविध ठराव मंजूर
ग्रामपंचायतीची साडेतीन तास ग्रामसभा; स्थानिक प्रश्नांवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. २७ : व्हनाळी (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीची १८ ऑगस्ट रोजी कोरमअभावी तहकूब झालेली ग्रामसभा आज झाली. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना सरपंच दिलीप कडवे व सदस्यांनी मुद्देसूद उत्तरे दिली. सुमारे साडेतीन ते चार तास चाललेल्या या सभेत ग्रामपंचायतीच्या कारभाराची वस्तुस्थिती समजल्याने ग्रामस्थांमधील गैरसमज दूर झाले.
ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या विविध माहिती व व्हिडिओंचाही संदर्भ सभेत आला. मात्र, ग्रामस्थांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष उत्तरे देत कामकाजाची माहिती स्पष्ट केल्याने सभेत सकारात्मक चर्चा झाली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. गावाच्या सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने व्यसनमुक्तीचा ठराव, सोशल मीडिया अथवा अन्य माध्यमांतून गावाची नाहक बदनामी करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा ठरावही सर्वांनुमते मंजूर केला. नवीन घरकुल सर्वेक्षणानुसार पात्र ठरलेल्या १४० लाभार्थ्यांच्या यादीचे सभेसमोर वाचन केले.
सरपंच कडवे यांनी विकासकामांची माहिती देताना म्हणाले, पात्र लाभार्थ्यांना २५० घरकुलांचे वाटप, महिलांसाठी बचतगट, विविध कौशल्य विकास कार्यक्रम, कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी, सुसज्ज बाजारपेठ, ‘बोलकी प्राथमिक शाळा’ उपक्रम, रस्ते व गटारींची कामे केली आहेत. माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांच्या विशेष प्रयत्नांतून मिळालेल्या नवीन शाळा इमारत, गावात सीसीटीव्ही यंत्रणा, घरगुती वीज बिल शून्य करण्याच्या उद्देशाने सौर पॅनेल बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
ग्रामसभेतील विविध विषयांना सर्वांनुमते मंजुरी दिली. उपसरपंच इंदुबाई दंडवते, सदस्य अरुण पोवार, संजय वाडकर, नामदेव गुरव, कविता वाडकर, क्रांती वाकुडे, अश्विनी जांभळे, वर्षाराणी कांबळे, पोलिसपाटील भगनाव पोवार, कृषी अधिकारी संदीप हजारे, आरोग्य अधिकारी सुधाकर पाटील आदी उपस्थित होते. तलाठी आलाबक्ष शहाणेदिवाण यांनी स्वागत केले. ओंकार कौंदाडे यांनी आभार मानले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.