04902
उघडिपीमुळे पिके काढणीला वेग
पन्हाळा तालुका; शेतकऱ्यांनी कसली कंबर
सागर चौगले / सकाळ वृत्तसेवा
माजगाव, ता. ३१ ः पन्हाळा तालुक्यातील माजगाव, पडळ, यवलूज, सातार्डे, माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे, उत्रे, वाघवे आदी ठिकाणी मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. अवेळी पावसामुळे मका, सूर्यफूल, भुईमूग, उन्हाळी भात आदी पिकांची काढणी खोळंबली. शिवारात पाणी साचल्याने काढणीला आलेल्या पिकांमध्ये कोंब फुटून बुरशी आली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. पाऊस थांबल्यामुळे पीक काढणीच्या कामाला वेग आला असून शेतकऱ्यांनी पुन्हा शेतात कंबर कसली आहे.
येथील शेतकरी उसासह मका, सूर्यफूल, भुईमूग, उन्हाळी भात अशा पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. मात्र यंदा मे महिन्यात मॉन्सूनपूर्व वादळी पावसामुळे या पिकांच्या काढणीत व्यत्यय आला. सतत पाऊस आणि शिवारात साचलेल्या पाण्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांना कोंब फुटले. ढगाळ वातावरणामुळे घरी काढून आणलेल्या मका, सूर्यफूल व भुईमूगाला बुरशी आली. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेली पीक शेतात उभी असतानाच वेळेपूर्वीच मॉन्सूनचे आगमन झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. यामुळे काढणीला आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. परंतु हवामान सुधारल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतात कंबर कसली आहे. सूर्यफूल मका, अजून काही दिवस पावसाने उसंत दिल्यास काढणीला आलेल्या पिकांची काढणी मळणी वाळवणी काम पूर्ण होणार आहेत. तसेच रखडलेल्या धूळवाफ भात पेरणीच्या कामांना वेग मिळणार आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. उन्हाळी भात काढणीला सुरुवात झाली आहे. अजून काही दिवस पावसाने उसंत दिल्यास रखडलेली ऊस भरणी पूर्ण होऊ शकते . खरिपातील भुईमूग पेरणीच्या कामांनाही गती मिळेल. शेतमजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्या मदतीने काढणीची कामे युद्धपातळीवर पार पडत आहेत.
....प्रतिक्रिया..
पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पिकांची काढणी मळणी वाळवणी रखडली होती. मात्र आता पाऊस उघडला असून कामे वेगाने सुरू झाली आहेत. यंदाचे सूर्यफूल चांगल्या प्रतीचे असून बाजारात चांगला दर मिळेल, अशी आशा आहे."
- रवींद्र चौगले शेतकरी, माजगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.