बाळूमामा देवस्थानला
‘अ’ वर्ग दर्जा मिळावा
आदमापूर ग्रामपंचायतीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. २५ : महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. भाविकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी देवस्थानला शासनाचा ‘अ’ वर्ग दर्जा मिळावा, या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदमापूर ग्रामपंचायतीच्या वतीने दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आदमापूर येथील श्री सद्गुरू बाळूमामा देवालय हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. बाळूमामांच्या बकऱ्यांचे तळ आसपासच्या चार राज्यांत श्रद्धेने फिरत आहेत. त्यामुळे आदमापूर येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. देवस्थान आपल्या परिसराबाहेर प्राथमिक सोयी सुविधांवर विकासात्मक लक्ष देण्यास कमी पडत असून, त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. या सर्वांचा विचार करुन अन्नछत्र, पाणी, वीज, भक्त निवास याचबरोबरच रस्ते, आधुनिक शौचालये, पार्किंग, दुकानगाळे, दर्शनरांग यांचा विकास होणे गरजेचे आहे. तसेच बाळूमामांचे वास्तव्यस्थळ असलेल्या श्री. मरगुबाई मंदिर परिसरातही भाविकांची गर्दी होत असल्याने तेथे उपलब्ध असलेल्या जागेचा उपयोग करून सोयीसुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. शिवाय गावच्या डोंगरावर असणाऱ्या विठूबाई देवालयाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा. या सर्व बाबींचा विचार करून श्री. बाळूमामा देवस्थानला ‘अ’ वर्ग दर्जा मिळावा. उपमुख्यमंत्री अजित पवार बाळूमामांच्या समाधी दर्शनासाठी आले असता ग्रामपंचायतीच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच विजय गुरव व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.