03240
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते
पन्हाळ्यात आयुष्यमान कार्डाचे वाटप
पन्हाळा, ता. २४ ः ९ वर्षांत पंतप्रधान मोदींनी देशाला प्रगतीपथावर नेले. महिलांच्या स्वयंसहाय्यता गटाआधारे स्त्री शक्तीचे दर्शन होत आहे. जागतिक आर्थिक शक्तीत भारत पाचव्या स्थानावर पोचला आहे, असे प्रतिपादन नागरी विमान वाहतूक आणि पोलादमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी येथे केले.
हातकणंगले लोकसभा प्रवास योजना, आयुष्यमान भारत लाभार्थीशी संवाद साधण्यासाठी ते येथे आले होते. सकाळी त्यांनी दैवत जोतिबाचे दर्शन घेतले. महिला सक्षमीकरण, शेतकरी सन्मान योजना, पाच लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय सेवा देणारी आयुष्यमान योजना, घराघरात नळपाणी पुरवठा योजना आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे मोदी सरकारच्या योजनांचा उहापोह केला. आगामी निवडणुकीतही मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या हस्ते काहींना आयुष्यमान भारत लाभार्थी ओळखपत्र देण्यात आली.
प्रास्ताविकात भाजप शहराध्यक्ष अमरसिंह भोसले यांनी तालुक्यात कामांचा आढावा घेत पाणीप्रश्न आणि पर्यायी रस्ताप्रश्नी नेत्यांनी लक्ष घालण्याचा तसेच कोल्हापुरात होणाऱ्या उड्डाणपुलाप्रमाणे बुधवार पेठ ते पन्हाळा नाका उड्डाणपूल करण्याची मागणी केली. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी जि.प. बांधकाम सभापती के. एस. चौगले, तालुकाध्यक्ष सचिन शिपुगडे, माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल, उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित होते.
----------------
चौकट..
योजनांचा लाभ मिळतो का....
केंद्र सरकारच्या योजना सांगताना त्या योजना खऱ्या आहेत की नाही, त्याचा लाभ तुम्हाला मिळतो की नाही, हे मोठ्याने सांगा. आपण शिवछत्रपतींच्या गडावर आहोत, असे ठासून विचारताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात हो.. हो..चा गजर केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.