02791
पेठवडगाव: येथील पद्मारोड ते धान्यलाईन या रस्त्यावरील खोदाईमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.
--------
वडगावात रस्ता खोदाईमुळे वाहतुकीचा बोजवारा
गटारींचे दोन महिन्यांपासून काम; बाजारपेठेत व्यापारी, नागरिकांना मनस्ताप
विवेक दिंडे : सकाळ वृत्तसेवा
पेठवडगाव, ता. २२ : येथे गटारींसाठी रस्ता खोदल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे आहे. ठेकेदाराच्या या कृतीमुळे रस्त्याचे नुकसान झाले आहे,
हे नुकसान नगरपालिका वसूल करणार का? असा प्रश्न नागरिकांतून होत आहे. बाजारपेठेतील पद्मारोड, धान्यलाईन, वाणी पेठ, गूळलाईन, भाजी मार्केट यार्ड रस्ता असे प्रमुख मार्ग आहेत. या मार्गावर किराणा, ज्वेलरी, कापड, धान्य, भाजीपाला विक्रीचे होलसेल व रिटेल व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. या मार्गापैकी झेंडा चौक ते मशीद दरम्यान एका बाजूचे गटार करण्याचे काम सुरू आहे.
या गटारीसाठी नगरोत्थान योजनेतून १५ लाखांचा निधी मिळाला आहे. दोन महिने काम सुरू आहे. शहरातील पूर्व भागातील सर्व गटारी या गटारीला मिळाल्यामुळे कायमस्वरूपी गटारीतून पाणी वाहत आहे. पावसाळ्यात गटार तुंबल्यास काही व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी जाण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे ही गटार होणे गरजेचे असल्यामुळे पालिकेने हे काम ठेकेदारास दिले. हे काम करताना गटारीतून जाणारे पाणी ठेकेदाराने पद्मारोड व धान्यलाईन हे दोन्ही रस्तेमध्येच उकरून पाणी एका बाजूने काढले आहे. याच पद्धतीने भाजी मार्केटजवळ रस्त्यात चाच मारून दुसऱ्या गटारीकडे पाणी वळवले आहे. रस्त्यामध्ये चाच मारल्यामुळे वाहन जाण्या-येण्यास त्रासदायक ठरत आहे. व्यापाऱ्यांना दुकानात लागणारा माल घेण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांना जाण्या-येण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारीमुळे उकरलेला रस्ता काही दिवसांपूर्वी बुजवलेला आहे, परंतु तो बुजवताना व्यवस्थित न बुजवल्यामुळे खड्डा व त्यातून निघालेले माती, मुरूम, दगड वाहतुकीला अडथळा व अपघातांना निमंत्रण देत आहे. रस्त्यावरच्या अतिक्रमणामुळे आधीच रस्ता लहान, त्यात या कामामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कोल्हापूरहून आष्टा जाणारी वाहतूक तुंबल्यास बाजारपेठेतून अनेक वाहने जातात, परंतु या वाहतुकीलाही अडथळा येत आहे.
------
कोट
मेन बाजारपेठेतील गटारीचे काम सुरू आहे. या कामासाठी कंत्राटदाराने रस्ता उकरला आहे, परंतु उकरलेला रस्ता कंत्राटदाराकडून सुरळीत करून घेणार आहे. सध्या पावसामुळे काम बंद आहे, हे काम सुरू झाल्यानंतर खड्डे बुजवले जातील.
-ओंकार महाडिक, नगरअभियंता, वडगाव नगरपालिका.
--
या गटारीचे काम करत असताना कंत्राटदाराने उकरले आहेत. त्यास जबाबदार त्याला धरून त्याच्याकडून रस्त्याच्या नुकसानीचे भरपाई पालिकेने घेतली पाहिजे.
हे काम करताना गटारीवरील अतिक्रमण केलेल्या पायऱ्या काढलेल्या नाहीत.
-सतीश मोरे, सामाजिक कार्यकर्ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.