नाही कलचाचणी, विद्यार्थ्यांसमोर अडचणी
चार वर्षांपासून बंद : दहावी-बारावीनंतरचे करिअर निवडण्यासाठी उपयुक्त
युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. २९ : दहावी-बारावी नंतर काय? विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे, हे समजून घेण्यासाठी शिक्षण विभागातर्फे कलचाचणी (अभिरुची कसोटी) घेतली जात होती. परंतु, चार वर्षांपासून कल चाचणी बंद आहे. परिणामी, पालक आणि विद्यार्थ्यांना पर्याय निवडण्यात अडचणी येत आहेत. खासगी संस्थांकडून कलचाचणी करून घेण्याचा खर्च सर्वसामान्य पालकांना परवडणारा नाही. त्यामुळे शासनानेच कलचाचणी पुन्हा सुरु करावी, अशी मागणी होत आहे.
खासगी संस्था तसेच शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलचाचणी घेण्यात येते होती. याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागाने २०१६ पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना मदत व्हावी, मुलांचा कल नेमका कोणत्या बाजूने आहे, हे शाळेतच कळाल्यावर त्यांना करिअर निवडण्यासाठी सुलभ व्हावे, या हेतूने कलचाचणीचा उपक्रम सुरू केला होता. कल चाचणीचा अभ्यासक्रम विद्या प्राधिकरण ठरवायचे. तर कल चाचणीची अंमलबजावणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात येत होती. परीक्षा मंडळांच्या माध्यमातून चाचणीची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. २०१५-१६ मध्ये राज्यात प्रथम ही चाचणी घेतली होती. तेव्हा पाच क्षेत्रीय कल चाचणी झाली होती. २०१६-१७ मध्ये बहिःस्थ विद्यार्थ्यांसह नियमित विद्यार्थ्यांनी सात क्षेत्रीय मानसशास्त्रीय कलचाचणी दिली होती. ही चाचणी त्या त्या विषयातील तज्ज्ञांच्या सूचनांनुसार विकसित केली होती. कल चाचणीनुसार कृषी, कला, वाणिज्य, ललित कला, आरोग्य विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रामधील अभिरुचीचे मापन केले जात होते. तीन वर्ष ‘ऑनलाइन’ चाचणी घेण्यात आली. २०१८-१९ मध्ये अभिक्षमता चाचणी घेतली होती. परंतु, आता कलचाचणी बंद आहे. त्यामुळे करिअर पर्याय निवडण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येते. कल ओळखायचे सोडून सर्व घेतात म्हणून आपणही प्रवेश घ्यावा, खोट्या प्रतिष्ठेसाठी झेपत नसले तरी विद्यार्थी नको ती शाखा पालकांच्या दबावामुळे निवडत असल्याने विद्यार्थ्यांसमोर पुढे पेच निर्माण झाला आहे. पैसे आहेत ते विद्यार्थी खासगी संस्थांकडून कलचाचणी करुन घेत आहेत. परंतु, गरीब विद्यार्थ्यांपुढे खर्चाचा विषय असल्याने त्यांची कलचाचणी होत नाही.
कोट
दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार करीअरचे क्षेत्र निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी मोफत कलचाचणीचा उपक्रम शिक्षण विभागाने पुन्हा सुरू करावा.
-प्रकाश कौंदाडे, अध्यक्ष समता शिक्षण प्रसारक मंडळ, शिरोली पुलाची
---
कोट
सध्या विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे आहे समजत नाही. त्यामुळे फक्त गुणांच्या फुगवट्यावरच अकरावी प्रवेश घ्यायचा का? असा प्रश्न पडतो. त्यामुळे शासनानेच कलचाचणी घेणे गरजेचे आहे.
-मनीषा माने, माजी जिल्हा परिषद सदस्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.