03712
रखडला पूल; वाहतूक कोंडी फुल
सांगली फाट्यावरील चित्र; योग्य नियोजनाची गरज
सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. ११ : राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामांमध्ये सांगली फाटा येथे उड्डाणपुलाचे काम रखडल्याने दिवसभरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. यामुळे वाहनचालक, प्रवासी व नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सांगली फाटा हे राष्ट्रीय महामार्ग व कोल्हापूर सांगली राज्यमार्गाला जोडणारे ठिकाण आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात सांगली फाटा येथे पुण्याहून कोल्हापूरकडे जाण्यासाठी दुपदरी उड्डाणपूल बांधला. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूलच नाही. त्यामुळे कोल्हापूरहून सांगलीकडे, सांगलीहून पुण्याच्या दिशेने आणि शिरोलीतून सांगलीकडे विरूध्द दिशेने जाणारी वाहने उड्डाण पुलाखाली समोरासमोर येत. परिणामी उड्डाण पुलाखालीच मोठ्या प्रमाणात अपघात झाले. यामुळे महामार्ग सहापदरीकरणाच्या कामांमध्ये कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू केले आहे. परंतु हे काम संथ गतीने सुरू असून, सध्या काम पूर्णतः बंद आहे.
उड्डाणपुलाच्या कामामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक उड्डाणपुलावरून एकेरी सुरू आहे. तसेच शिरोली व सांगलीच्या दिशेने जाणारी वाहतूक सेवा मार्गावरून वळविली आहे. या ठिकाणी वाहतुकीचे कोणतेही नियोजनच करता येत नसल्याने, वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा परिणाम सेवामार्ग व महामार्गावरील वाहतुकीवर होत आहे.
सांगली फाट्यावर महामार्गाला लागूनच वाळू मार्केट आहे. सांगली फाटा येथून हालोंडी पर्यंत दोन्ही बाजूला रस्त्यालगतच मार्बल मार्केट आहे. या ठिकाणी परराज्यातून माल घेऊन येणारी वाहन, तसेच दोन्ही बाजूस असलेले पेट्रोल पंप, मोठे फर्निचर माॅल, गाड्यांची शोरूम्स, ट्रॅक्टर शोरूम्स, पश्चिम महाराष्ट्राला पुरवठा करणारे मद्य गोदाम, सिमेंट गोदाम, विविध गोदाम, कोल्हापूर मधील भाजीपाला मार्केट, दुध, साखर या सर्व व्यवसायासाठी दररोज सांगली फाटा येथून पंधराशेपेक्षा जादा मालवाहतूक गाड्या येतात व जातात. परिसरात शंभरहून अधिक ट्रान्सपोर्ट आहेत. यामुळे कायमचे वर्दळीचे हे ठिकाण आहे. याठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी व अपघात हमखास ठरलेले आहेत.
---
चौकट
बस स्टॉपची भर
सांगली फाटा उड्डाण पुलासमोर महामार्गावरच दोन्ही बाजूस दोन बस स्टॉप आहेत. वडगाव, कोल्हापूर, इचलकरंजी, हातकणंगले येथे जाण्यासाठी वडाप गाड्या तसेच पुणे मुंबईला जाणाऱ्या आराम बसेस व पत्ता विचारायला मालवाहतूक वाहने येथेच महामार्गावर मध्येच थांबवतात. त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते.
--
कोट
सांगली फाटा येथील उड्डाणपूलाचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार.
- पद्मजा करपे, सरपंच, शिरोली.
सहापदरीकरणांमध्ये सांगली फाटा ते पंचगंगा नदी या भागात पिलर वरचा उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी यापूर्वीच आम्ही केली आहे. पिलरचा उड्डाणपूल झाल्यास स्थानिक वाहतुकीला शिस्त लागेल.
- शशिकांत खवरे, माजी सरपंच, शिरोली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.